‘पलॅश मॉब'द्वारे मॉलमध्ये मतदार जनजागृती

नवी मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार असणाऱ्या नागरिकांनी मतदान करुन मतदानाचा हक्क बजावावा याकरिता स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

यामध्ये नुकताच मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेले पहिल्यांदाच मतदान करणार १८ वर्षावरील युवक-युवती यांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित केले जात असून महाविद्यालयांमध्ये तसेच युवक संघटनांमध्येही मतदार जनजागृती विषयक उपक्रमांवर भर दिला जात आहे.

या अनुषंगाने शनिवार आणि रविवारी होणारी मॉलमध्ये येणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन वाशी येथील इनऑर्बिट मॉल तसेच सीवुडस्‌ येथील ग्रँड सेंट्रल मॉल या २ ठिकाणी लोकांना चटकन आकर्षित करुन घेणाऱ्या पलॅश मॉब सारख्या संगीतमय कलाप्रकाराचा मतदार जनजागृतीसाठी प्रभावी वापर करण्यात आला.

मॉल मधील वातावरण खरेदीसाठी उत्साही असताना आणि तशा प्रकारची लगबग मॉल मधील प्रत्येक दुकानातून सुरु असताना अचानक मोठ्या आवाजात गीत-संगीत वाजायला सुरुवात होते. गाणे कुठे वाजते आहे याचा कानोसा घेत लोक आवाजाच्या दिशेने सूरांचा शोध घेण्यासाठी पुढे येतात. त्यावेळी त्यांना मॉलच्या तळमजल्यावर मधल्या मोकळ्या पॅसेजमध्ये संगीत वाजायला सुरुवात झाल्याचे लक्षात येते आणि त्या तालावर नृत्यासाठी सज्ज असलेले तरुण, तरुणी दिसतात. गाणे वाजायला सुरुवात होते आणि त्या तालावर ते तरुण-तरुणी समुहनृत्य सुरु करतात. बघता बघता नृत्य पाहणे सुरु असतानाच गाण्यानंतर चक्क मतदान विषयक जनजागृती करणारे गाणे सुरु होते. मग मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणारी गाणी एकापाठोपाठ एक नृत्यासह सादर होत जातात.

नृत्याविष्काराच्या अखेरीस २० मे रोजी होणाऱ्या ठाणे लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन मतदान करण्याविषयीचे फलक उंचावत केले जाते. नागरिकही या तरुणाईला प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात त्यांच्या नृत्याचे कौतुक करुन लोकसभा निवडणूकीत आम्ही मतदान करणार आहोत, अशी ग्वाही देखील देतात.

वर्दळीच्या ठिकाणी अचानक सुरु होणारा गीत-संगीतमय पलॅश मॉब नागरिकांना आकर्षित करणारा आणि त्याचवेळी मतदानाविषयी जनजागृती करणारा असल्याने सदर उपक्रम सर्वार्थाने यशस्वी झाला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेसाठी नवी मुंबईतील वाहतूकीत बदल