मुंबई शिक्षक व पदवीधर,कोकण विभाग पदवीधर

नवी मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी 10 जून 2024 रोजी मतदान होणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त पी.वेलरासू यांनी पत्रकार  परिषदेद्वारे दिली.

भारत निवडणूक आयोगाकडून घोषित कार्यक्रमानूसार 15 मे 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीसाठी 22 मे  रोजी दुपारी 3.00 वाजे पर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे सादर करता येतील. उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी 24 मे रोजी  सकाळी 11 वाजे पासून केली जाईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत .27 मे दुपारी 3 वाजे पर्यंत राहील. 10 जून 2024 रोजी सकाळी 8 ते सायं 4  या वेळेत या मतदारसंघांकरिता मतदान होईल. 13 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून  मतमोजणीस सुरुवात होईल. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 18 जून 2024 रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

मुंबई शिक्षक मतदार संघ, मुंबई पदवीधर मतदार संघ व कोकण विभाग पदवीधर मतदार संघ या तीनही मतदार संघासाठी कोकण विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहतील. मुंबई शिक्षक मतदार संघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ या दोन मतदारसंघासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगरचे  जिल्हाधिकारी आणि कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच कोकण विभाग पदवीधर मतदार संघाकरिता ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी व कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील, अशी माहिती आयुक्त पी.वेलरासू यांनी यावेळी दिली.

आचारसहिंतेबाबत माहिती देताना आयुक्त पी. वेलरासू म्हणाले की, कोकण विभागात जिल्हास्तरावर आचारसंहिता स्थायी समितीची स्थापना करण्यात आली आहे,  या समितीत जिल्हाधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. जिल्हास्तरावर  तक्रार निवारण कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समिती  व भरारी पथक स्थापन करण्यात आली आहेत. 

तालुकास्तरावर व्हिडीओग्राफी पथक तयार करण्यात आले असून, या पथकांमार्फत राजकीय पक्ष/लोकप्रतिनिधी यांच्या दौऱ्यादरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत पर्यवेक्षण करण्यात येत आहे. 

विभागीयस्तरावर चोवीस तास चालू असलेला तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  प्रसार माध्यमांनी निवडणूकीबाबत जनसामान्यांमध्ये जनजागृती करावी. असे आवाहन यावेळी आयुक्त पी.वेलरासू यांनी या पत्रकार परिषदेत केले.  

या पत्रकार परिषदेत उपआयुक्त (आस्थापना) विवेक गायकवाड, उपआयुक्त (सामान्य) अमोल यादव, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे, आदी उपस्थित होते. 

मुंबई शिक्षक व पदवीधर,कोकण विभाग पदवीधर मतदार संघात एकूण 1 लाख 77 हजार 32 मतदारांची नोंदणी...

मुंबई पदवीधर मतदार संघात स्त्री 37 हजार 619 तर पुरुष 53 हजार 641 असे एकूण 91 हजार 263 मतदार आहेत.  तर मुंबई शिक्षक स्त्री 10 हजार 849, तर पुरुष 3 हजार 666 असे एकूण  14 हजार 515 मतदार आहेत.त्याच प्रमाणे कोकण विभाग पदवीधर मतदार संघात स्त्री 74 हजार 575, तर पुरुष 1 लाख 2 हजार 442 असे एकूण  1 लाख 77 हजार 032 मतदार आहेत. 

मतदारांची संख्या वाढविण्यासाठी मतदार नोंदणी अर्ज करण्यासाठी दि. 12 मे 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  हे अर्ज पदनिर्देशित ठिकाणी ऑनलाइन व ऑफ लाइन स्वीकारले जातील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी http://gterollregistration.mahait.org या लिंकचा वापर करावा. शिक्षक पदवीधर मतदारांची  संख्या वाढविण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न व्हावेत, समाज माध्यमांनी या बाबत विशेष जनजागृती करावी, असे आवाहन यावेळी कोकण विभाग आयुक्त पी.वेलरासू यांनी केले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘मतदार जोडो पदयात्रा'स नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद