कल्याण, भिवंडी मध्ये ‘प्रचारसभां'द्वारे उडणार राजकीय धुराळा

कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला वेग आला आहे. २४-कल्याण आणि २३-भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेते मंडळींच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत मतदारांना संबोधित करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे आजी-माजी मुख्यमंत्री, उपमुख्य मंत्री, विविध पक्षांचे पक्षाध्यक्ष तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आल्याने कल्याण-डोंबिवली शहरासह आजुबाजुच्या शहरात आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडणार असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या ३ लोकसभा मतदार संघापैकी कल्याण आणि भिवंडी  लोकसभा मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दोन्ही लोकसभा हाय व्होल्टेज मतदार संघाच्या निवडणुका म्हणून पाहिले जात आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात सर्व ताकदीनिशी उभे राहिले असून विजयाची हॅटट्रिक मारण्याच्या तयारीला लागले आहेत. तर शिवसेना पक्ष फुटीनंतर ‘शिवसेना'चे दोन गट तयार झाल्याने शिवसेना शिंदे गट विरोधात शिवसेना उध्दव ठाकरे गट अशी चुरशीची लढत या मतदार संघात दिसणार आहे.

शिंदे गटाचे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उध्दव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर या ‘महाविकास आघाडी'च्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उभ्या असल्याने त्यांच्या विजयासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह ‘राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार गट'चे पक्षाध्यक्ष शरद पवार, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड तसेच ‘काँग्रेस'च्या नेते मंडळींनी कंबर कसली आहे. शिंदे गटाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराला ‘महायुती'तील शिवसेना-भाजपा मधील नेते मंडळींच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. याशिवात ‘महायुती'ला ‘मनसे'ने पाठिंबा दिल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेना गटाने ‘कल्याण लोकसभा मतदारसंघ'ची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

दुसरीकडे ‘भिवंडी लोकसभा मतदारसंघ'मधून भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उभे राहिले असून त्यांच्या विरोधात ‘राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार गट'चे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार तर ‘जिजाऊ सामाजिक संघटना'चे निलेश सांबरे अपक्ष निवडणूक लढवीत असल्याने या मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. महत्वाचे म्हणजे ना. कपिल पाटील आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सभा'चे १५ मे रोजी कल्याण मध्ये आयोजन करण्यात आले आहे.

‘महायुती'ला पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ १२ मे रोजी डोंबिवली पूर्व मधील ह.भ.प. सावळाराम क्रीडा संकुल येथे सभा होणार आहे. याच ठिकाणी १३ मे रोजी ‘इंडिया-महाविकास आघाडी'तर्फे ‘प्रचार सभा'चे आयोजन करण्यात आले आहे. तर १७ मे रोजी ‘इंडिया-महाविकास आघाडी'च्या वतीने ‘राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांची मुंब्रा येथे सभा होणार आहे.

दरम्यान, विविध पक्षांच्या राज्यातील नेत्यांसह परराज्यातील नेते मंडळींची सभा आयोजित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार ‘उत्तर प्रदेश'चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा कल्याण लोकसभा मतदारसंघ मध्ये आयोजित केली जाणार असून याची तारीख अद्याप ठरली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख संपल्यानंतर प्रचारसभांना खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. त्यामुळे ७ मे पासून मतदानाच्या २ दिवस अगोदर प्रचारसभांचा धुराळा कल्याण, भिवंडी सह इतर लोकसभा मतदारसंघात उडणार, हे मात्र नवकी.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबई पोलिसांचे परिमंडळ-२च्या हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट