नवी मुंबई पोलिसांचे परिमंडळ-२च्या हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट  

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत परिमंडळ-२ मध्ये ३ मे रोजी रात्री ऑपरेशन ऑल आऊट राबविण्यात आले. या ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी ५१ पाहिजे असलेले आणि फरार आरोपींना अटक केली. त्याचप्रमाणे अंमली पदार्थ बाळगणारे, सेवन करणारे, अवैध दारु विकणारे सेवन करणाऱ्यांवर देखील धडक कारवाई केली. त्याशिवाय पोलिसांनी रेकॉर्ड वरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीशीटर, संशयित व्यक्तींची तपासणी करुन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्याने नवी मुंबई पोलिसांनी रेकॉर्ड वरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीशीटर तसेच अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांची झाडाझडती सुरु केली आहे. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या भागामध्ये कोंबींग आणि ऑल ऑऊट ऑपरेशन राबवून गुन्हेगार आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. ३ मे रोजी रात्री पोलिसांकडून परिमंडळ-२ च्या हद्दीमध्ये ऑल ऑऊट ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये पनवेल शहर, पनवेल तालुका, खांदेश्वर, कामोठे, कळंबोली, तळोजा, खारघर, उरण, न्हावाशेवा, मोरा सागरी या १० पोलीस ठाण्यातील अधिकारी, पोलीस अंमलदारांनी आपापल्या हद्दीत ऑल ऑऊट ऑपरेशन राबवून गुन्हेगार तसेच बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची धरपकड केली.  

या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी ५१ पाहिजे आरोपींना अटक केली. तसेच कोकेन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या नायजेरीयन नागरिकाला अटक करुन त्याच्याकडून तब्बल सव्वा दोन लाख रुपये किंमतीचे कोकेन जप्त केले. तसेच अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या २० जणांवर त्याचप्रमाणे दारुची विक्री, सेवन आणि वाहतूक करणाऱ्या ३१ जणांविरुध्द कारवाई केली. या कारवाई दरम्यान ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या नाकांबदीदरम्यान, पोलिसांनी मोटारवाहन कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या ५८६ वाहन चालकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. त्याचप्रमाणे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकाला अटक करण्यात आली.  

तसेच बेलेबल वॉरंट आणि नॉन बेलेबल वॉरंट असलेले ११ आरोपी देखील मिळून आले. त्याचप्रमाणे १२८ संबंधितांना समन्सची बजावणी करण्यात आली. त्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या ९० व्यक्तींविरोधात कोपटातंर्गत कारवाई करण्यात आली. तसेच अभिलेखावरील ४२ हिस्ट्रीशिटर आरोपींची तपासणी करण्यात आली. तसेच रेकॉर्डवरील एकूण ६० आरोपींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १३ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच कलम २८३, २८५ नुसार २७ कारवाया करुन इतर ४ अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे ३ बारवर तसेच ४५ एमपी ॲक्ट ११०/११७ नुसार कारवाई करण्यात आली.  

पोलीस आयुवत मिलिंद भारंबे यांच्या निर्देशानुसार परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या ऑल ऑऊट ऑपरेशनमध्ये ‘पनवेल'चे सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी यांच्यासह इतर अधिकारी, पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे अधिकारी-अंमलदार सहभागी झाले होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 मतदानासाठी एकमेकांना प्रोत्साहन देऊया, मतदानाची टक्केवारी वाढवूया!