छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
नवी मुंबईतील ‘भाजपा'च्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शिवसेना'ला गेल्याने नवी मुंबई मधील ‘भाजपा'च्या कार्यकर्त्यांमध्ये विशेषतः नाईक समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे ‘भाजपा'च्या नवी मुंबईमधील माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा हजारोच्या संख्येने सामुहिक राजीनामे देवून आपला संताप व्यक्त केला.
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ‘महायुती'कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक ‘ठाणे'चे माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे ‘नवी मुंबई'चे माजी महापौर जयवंत सुतार, माजी नगरसेवक अनंत सुतार, रवींद्र इथापे, दशरथ भगत, नेत्रा शिर्के, सुरज पाटील, शुभांगी पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी २ मे रोजी एकत्र येत संजीव नाईक यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली.
ठाणे लोकसभा मतदारसंघात विकास करण्याची क्षमता माजी खासदार संजीव नाईक यांच्याकडे असताना ‘ठाणे'ची जागा ‘शिवसेना'ला गेली आहे. सदर मतदारसंघ आणि पक्षहितासाठी योग्य नाही. त्यामुळे या निर्णयाचा पक्षश्रेष्ठींनी पुनर्विचार करून संजीव नाईक यांना उमेदवारी द्यावी अन्यथा आमचे राजीनामे मंजूर करावेत, अशी मागणी यावेळी केली.
दरम्यान, ‘शिवसेना'चे नवी मुंबई जिल्हाप्रमुखांनी ठाणे लोकसभा मतदारसंघात ‘भाजपा'चा उमेदवार देल्यास त्याचा प्रचार करणार नाही, अशी ‘महायुती'चा धर्म मोडणारी भूमिका पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली होती. त्याचे तीव्र पडसाद भाजप कार्यकर्त्यांमध्ये उमटले आहेत.
दुसरीकडे ‘भाजपा'च्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना संयम राखण्याचे आवाहन करीत आमदार गणेश नाईक यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशनुसार काम करुन देशाचे पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे अशी भाजपा कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, असे सांगितले. तर‘भाजपा'चे नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी कार्यकर्त्यांशी बोलून त्यांची नाराजी दूर करु, वेळ पडल्यास याबाबत पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करु, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
संजीव नाईक यांना उमेदवारी मिळणार असे शेवटपर्यंत सांगण्यात येत होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी निर्णय वेगळाच घेतला.
विकासाचे काम करणारा उमेदवार पाहिजे होता. संजीव नाईक यांच्याकडे जिंकून येण्याची क्षमता आहे.
- ॲड. अपर्णा गवते, माजी नगरसेविका.
ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विकास साधण्याची क्षमता संजीव नाईक यांच्यात आहे. यापूर्वी खासदार म्हणून त्यांनी ते सिध्द केलेले आहे. अजुनही वेळ गेली नाही. ‘महायुती'ने उमेदवार बदलावा.
- निशांत भगत, युवा नेता, भाजपा.
संजीव नाईक यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी आमची मागणी आहे. पक्षश्रेष्ठींनी या मागणीचा विचार करावा आणि आपला निर्णय बदलावा.
-योगेश पाटील, भाजपा कार्यकर्ता.