पनवेल पोलिसांतर्फे ‘रुट मार्च'द्वारे निर्भयपणे मतदान करण्याचा संदेश

नवी मुंबई : येत्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांच्या वतीने शिस्तबध्दरितीने रुट मार्च काढण्यात आला. तसेच लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस यंत्रणा सज्ज आहे, असा इशारा रुट मार्चदरम्यान पोलिसांनी दिला.  

‘लोकसभा निवडणूक-२०२४'च्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच समाजकंटकांवर आणि गुन्हेगारांवर वचक राहून निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी आणि मतदारामध्ये विश्वासार्हता वाढीस लागावी याकरिता सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रुट मार्च काढण्यात येत आहे. त्यानुसार २९ एप्रिल रोजी पनवेल शहर पोलिसांतर्फे रुट मार्च काढण्यात आला. या रुट मार्चमध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्यातील २ पोलीस निरीक्षक, ३ सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ३० पोलीस अंमलदार तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालायत दाखल झालेल्या ३ एसआरपीएफ कंपनीचे ३ अधिकारी, ६५ अंमलदार सहभागी झाले होते.  

सदर रुट मार्च वेळी पोलिसांनी पनवेल मधील महत्त्वाची मतदान केंद्रे, संवेदनशील परिसर, संमिश्र वस्ती, आदि ठिकाणी भेट दिली. पनवेल शहर पोलीस ठाणे येथून सुरु झालेला रुट मार्च बावन्न बंगला-सुफा मस्जीत-मुसलमान नाका मोहल्ला-पटेल मोहल्ला-कोळीवाडा-उरण नाका, पंचरत्न चौक-तक्का गांव-रेल्वे स्टेशन-शिवाजीनगर-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा काढून एसटी डेपो येथे समाप्त करण्यात आला. आचारसंहिता कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस यंत्रणा सज्ज आहे, असा इशारा या रुट मार्चदरम्यान देण्यात आला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबईतील ‘भाजपा'च्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे