निर्भिड, पारदर्शकपणे लोकसभा निवडणूक पार पाडण्यासाठी दक्षता घ्या

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील २३-भिवंडी, २४कल्याण आणि २५-ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. येत्या २६ एप्रिलपासून नामनिर्देशन पत्रे भरण्यास सुरुवात होणार असून ‘भारत निवडणूक आयोग'कडून नियुक्त निरीक्षक ठाणे जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात येणार आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांनी दक्ष राहून सर्व पथकांना सतर्कपणे काम करण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या आहेत.

‘लोकसभा निवडणूक-२०२४'च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शिनगारे यांनी जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात आचारसंहिता पथक, दक्षता पथक, व्हिडीओ चित्रीकरण पथक, व्हिडीओ पाहणारे पथक, भरारी पथक, स्थिर देखरेख पथक, तसेच आयकर विभाग, अबकारी कर विभाग, २४×७ कॉल सेंटर, माध्यम कक्ष यासह निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खर्च सर्व पथकांनी यापुढील काळात अतिशय बारकाईन प्रत्येक प्रक्रियेवर लक्ष ठेवावे. तसेच खर्च निरीक्षकांनीही उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या खर्चावर लक्ष ठेवावे. जिल्ह्यात कुठेही आचारसंहिता भंग होणार नाही, याची दक्षता संबंधित पथकाने घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी आचारसंहिता भंगाची तक्रार येईल, तेथे तातडीने गुन्हे दाखल करावे. निवडणुकीच्या कालावधीत अवैध रक्कम पकडणे, तिचा पंचनामा करणे, दारु, अन्य अवैध पदार्थ ताब्यात घेऊन दंडात्मक तथा प्रसंगी फौजदारी कारवाई भरारी पथकामार्फत करण्यात यावे, अशा सुचनाही जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दिल्या.

सर्व मतदारसंघातील एक खिडकी कक्षातून राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आवश्यक ते परवाने देताना दक्षता घ्यावी. परवानगी मागणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, ते बघावे. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखली जाईल आणि कोणत्याही प्रकारे त्याचा भंग होणार नाही, यासाठी पोलीस विभागाने बंदोबस्त ठेवावा. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे, निर्भिड वातावरणात पार पडण्यासाठी सर्वच यंत्रणांनी जबाबदारीने कामे करावीत. -अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

विद्यार्थ्यांकडून ‘जनजागृतीपर पथनाट्य'द्वारे मतदानाचा संदेश