ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
उल्हासनगर मधील मान्सूनपूर्व कामांचा संयुवत बैठकीत आढावा
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील वाहतुकीच्या समस्या आणि मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांची तसेच महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक २४ एप्रिल रोजी महापालिका स्थायी समिती सभागृहात संपन्न झाली.
या बैठकीप्रसंगी महापालिका आयुवत अजीज शेख, ठाणे वाहतूक पोलीस उपायुवत डॉ. विनय राठोड, अतिरिक्त महापालिका आयुक्त जमीर लेंगरेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय पवार, ‘एमएमआरडीए'चे अधीक्षक अभियंता कोरगावकर, उपायुक्त किशोर गवस, सुभाष जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे, सुधाकर खोत, प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, मनिष हिवरे, अनिल खतुरानी, दत्तात्रय जाधव, पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, विद्युत विभाग कार्यकारी अभियंता हनुमंत खरात, बांधकाम उपअभियंता तरुण सेवकानी, परिवहन विभाग प्रमुख विनोद केणे, भांडार विभाग प्रमुख अंकुश कदम, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, आदि उपस्थित होते.
बैठकीमध्ये उल्हासनगर शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत समन्वय आणि संयुक्त कार्यवाही करण्याचे निश्चित करण्यात आले. शहरातील रस्त्यावरील खड्डे पावसाळ्यापूर्वी भरणे. प्रमुख रस्त्यांचे जे कामकाज सुरु आहे ते पूर्ण करुन रस्ता वाहतुकीस मोकळा करणे. सर्व प्रभाग अधिकारी यांनी आपापल्या प्रभाग क्षेत्राचा सर्व करुन ज्या ठिकाणी मलनिःस्सारण वाहिनीचे चेंबर उघडे असेल तेथे झाकण लावण्यात यावे. अनधिकृत रिक्षा आणि अनधिकृत रिक्षा थांबे यांचे सर्वेक्षण करणे. रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याबाबत संयुक्त कार्यवाही करणे. अनधिकृत टपऱ्यांवर कार्यवाही करणे. शहरातील रस्त्यांवर अनधिकृत अवजड वाहने पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करणे. परिवहन सेवेस अडथळा करणाऱ्या वाहनांवर आणि व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे. शहरातील रस्त्यांवर वाहतूक नियमनासाठी विशिष्ठ रंगाचे पट्टे मारणे. सम-विषम तारखेच्या अनुषंगाने पार्किंगबाबत नागरिकांमध्ये शिस्त निर्माण होण्यासाठी नियमितपणे कारवाई करणे. शहरातील व्यापारी असोसिएशन यांच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठक घेऊन शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करणे. बेवारस वाहनांच्यावर ट्रॅफिक आणि आरटीओ यांच्या सोबत मिळून महापालिकेने संयुक्त कारवाई करणे, अशा अनेक समस्यांवर चर्चा होऊन कालबध्द नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले.
शहरात ‘एमएमआरडीए'च्या माध्यमातून सुरु असलेल्या कामाच्या प्रगती बाबत ‘एमएमआरडीए'चे अधीक्षक अभियंता कोरगावकर यांनी तसेच कंत्राटदारांनी विहित मुदतीत काम पूर्ण होण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासित केले.
पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करणे, मोठे आणि छोटे नाले सफाई करणे आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने कार्यवाही करणे, याबाबत आयुक्त शेख यांनी विभागप्रमुखांना निर्देश दिले.
दरम्यान, वाहतूक पोलीस आणि महापालिका यांनी समन्वय ठेवून शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सतत आणि नियमित जनजागृती बरोबरच शिस्त लावण्यासाठी कारवाई करण्याची सूचना पोलीस उपायुवत डॉ. विनय राठोड यांनी केली. वाहतुकीच्या समस्या तिथल्या तिथे सुटाव्यात यासाठी यापुढे महापालिका आणि संबंधित विभागांची सातत्याने बैठक घेऊन उपस्थित मुद्यांनुसार वेळोवेळी आढावा घेऊन एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.
प्रारंभी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी प्रास्ताविकातून मागील बैठकीतील निर्देश आणि त्याची अंमलबजावणी याबाबत संक्षिप्त माहिती दिली. बैठकीमध्ये उपायुक्त किशोर गवस यांनी आभार मानले.