एपीएमसी शौचालय वाटप घोटाळा प्रकरण

नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय घोटाळा प्रकरणात गुन्हे शाखेने फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांच्या पाठोपाठ शिवनाथ वाघ या बाजार समिती लिपीकाला देखील अटक केली आहे. २५ एप्रिल रोजी वाघ याला सीबीडी बेलापूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २ दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, गुन्हे शाखेने आणखी एका संचालकाची चौकशी सुरु केली असून त्यांनाही अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  

एपीएमसी मार्केट वरील संचालक आणि अधिकारी यांनी सर्व नियम पायदळी तुडवून ‘बाजार समिती'च्या आवारातील विविध शौचालयांचे आपल्या मर्जीतील मारु सेवा संघ, विकास कन्स्ट्रक्शन्स, अमोल कन्स्ट्रक्शन्स, भूमी कन्स्ट्रक्शन्स या संस्थांना त्यांच्या मूळ उद्दिष्टांमध्ये प्रसाधन गृह चालविणे नसतानाही वाटप केल्याचे नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात उघडकीस आले होते. तसेच काहींचे नियमबाह्य पध्दतीने भाडे कमी करुन सुरेश मारु यांना नियमबाह्यरित्या शौचालयाचे वाटप केल्याचे अणि त्यामुळे एपीएमसी मार्केटचे तब्बल ७ कोटी ६१ लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे तपासात आढळून आले होते.  

यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२३ मध्ये ‘राष्ट्रवादी काँग्रेस'चे आमदार शशिकांत शिंदें यांच्यासह ‘बाजार समिती'मधील आजी-माजी अधिकारी अशा ८ जणांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अपहार, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरणात सहभागी असलेल्या सुरेश मारु, मनेश पाटील आणि सिद्राम कटकधोंड या तिघांना अटक केली होती.

दुसरीकडे संजय पानसरे यांना एपीएमसी मार्केटमधील प्रसाधनगृह वाटप प्रक्रियेमध्ये आर्थिक लाभ मिळाल्याचा तसेच पानसरे आणि प्रसाधनगृह चालविणाऱ्या मे. निर्मला औद्योगिक संस्था यांच्यामध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. पानसरे यांचा इतर प्रसाधनगृह चालकांशी देखील आर्थिक हितसंबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने २४ एप्रिल रोजी संजय पानसरे यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीअंती सायंकाळी ४ वाजता अटक केल्यानंतर त्यांना सीबीडी बेलापूर येथील जिल्हा-अति. सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सज पाने यांची या प्रकरणाच्या चौकशीसाठी २ दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.  

त्यापाठोपाठ गुन्हे शाखेने आता २५ एप्रिल रोजी ‘बाजार समिती'तील लिपीक शिवनाथ वाघ याला अटक केली. शिवनाथ वाघ याला देखील न्यायालयाने २ दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.  

कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय वाटप घोटाळा प्रकरणात ‘फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे आणि शिवनाथ वाघ अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना २६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
-अजयवुÀमार लांडगे, सहाय्यक पोलीस आयुवत-गुन्हे शाखा, नवी मुंबई. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उल्हासनगर मधील मान्सूनपूर्व कामांचा संयुवत बैठकीत आढावा