ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

पनवेल ; ‘लोकसभा निवडणूक-२०२४'च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘जेष्ठ नागरिक संघ'च्या सभागृहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महापालिका आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ३३-मावळ लोकसभा मतदारसंघ मधील १८८- पनवेल विधानसभा मतदार संघ अंतर्गत घ्ोण्यात आलेल्या सदर कार्यक्रमास स्वीप पथक प्रमुख शहर अभियंता संजय जगताप, शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण, प्रभाग अधिकारी रमेश माळी, ‘ज्येष्ठ नागरिक संघ'चे अध्यक्ष जयवंत गुर्जर, सचिव सुनिल खेडेकर, उपाध्यक्ष माधुरी गोसवी, महापालिका अधिकारी विनया म्हात्रे, स्वप्नाली चौधरी, प्रसाद परब, गजानन पाटील उपस्थित होते.

‘निवडणूक आयोग'ने मतदार कमी होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी समाजातील वेगवेगळ्या गटापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. पनवेल महापालिकेच्या अधिकारी-कर्मचारी, आशा सेविका, बचत गटाच्या महिला अशा सर्वांच्या माध्यमातून विविध गटापर्यत पोहोचून आम्ही मतदान जनजागृती करत आहोत. ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा फायदा उमेदवार निवडीमध्ये होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी आणि त्यांच्या कुटुंबातील १८ वर्षांवरील नागरिकांनी मतदान  प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन स्वीप पथक प्रमुख शहर अभियंता संजय जगताप यावेळी मार्गदर्शन करताना केले.

यावेळी शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी देखील मतदान करण्याबाबात ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सुजित म्हात्रे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे सुमारे २५० सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, तळोजा, सेक्टर-५, सेक्टर-३ कळंबोली, देवीचा पाडा, नौपाडा, कल्पतरु, पनवेल कच्छी मोहल्ला अशा विविध ठिकाणी आशा सेविकांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच नवनाथ नगर पनवेल येथे बचत गटांतील महिलांकडून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर पोदी-२ झोपडपट्टी, जय सेवालाल नगर झोपडपट्टी पनवेल येथे मतदारांमध्ये महापालिका अधिकाऱ्यांमार्फत जनजागृती करण्यात आली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नेरुळ मध्ये आणखी ५ पलेमिंगोचा मृत्यू, ७ जखमी