प्रदुषण नियंत्रणासाठी मल्टिपर्पज डस्ट सप्रेसशन व्हेईकलचा उतारा

पनवेल : पर्यावरणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्यदायी राहणीमान देण्याकरिता पनवेल महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये धुळीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने पर्यावरण विभागाच्या तापयात मल्टिपर्पज डस्ट सप्रेसशन व्हेईकल्स (धूळ शमन वाहन) सज्ज केल्या आहेत. या गाड्या कशा पध्दतीने काम करतात? याचा आढावा आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी नुकताच घ्ोतला. याप्रसंगी उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, घनकचरा-आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे, वाहन विभाग प्रमुख राजेश डोंगरे, स्वच्छता निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पर्यावरणाचे भान जपण्यासाठी पनवेल महापालिका माझी वसुंधरा संकल्पना अंतर्गत विविध कार्यक्रम राबवत असते. या कार्यक्रमाच्या जोडीला महापालिकेने नुकतीच २ अत्याधुनिक बहुउद्देशीय स्प्रेअर आणि डस्ट सप्रेशन व्हेईकल्स खरेदी केली आहेत. अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेले सदर वाहने हवेतील धुलीकणांचा सामना करण्यासाठी उपयुक्त आहेत. यामध्ये फवारणी आणि साफसफाईच्या उद्देशाने ६००० लिटरची पाण्याची टाकी, एअर कर्टन-आधारित वॉटर मिस्ट सप्रेशन सिस्टीम, फ्रंट आणि रिअर रोड पलशिंग सिस्टीम, ग्रीन बेल्ट गार्डनिंग क्लिनिंग सिस्टीम आणि उंच झाडांवरील धूळ साफ करण्याच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण यंत्रणा यामध्ये समाविष्ट आहे.

सदर वाहने दररोज अंदाजे ८० किलोमीटर अंतर कापतात. यामुळे पनवेल महापालिका क्षेत्राचा विस्तृत परिसर स्वच्छ करणे सोपे होणार आहे. सदर बहुउद्देशीय वाहने केवळ धूळ कमी करत नाही तर रस्ता आणि दुभाजकांमधील हरित पट्टा स्वच्छ करण्यासही मदत करतात.

वाढत्या औद्योगिकीकरणाने दिवसेंदिवस वाढणारी धूळ कमी करण्यासाठी सदर वाहने पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. वाढते बांधकाम क्रियाकलाप आणि वाहनांची वाहतूक त्यामुळे हवेमध्ये धुलीकणांचे प्रमाण वाढून हवेची गुणवत्ता खराब करतात. यामुळे लहान मुले, वृध्द आणि श्वसनाची समस्या असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यासही धोका निर्माण होतो. यावर उपाययोजना म्हणून महापालिकने धुळीचा प्रभाव कमी करणारे बहुउद्देशीय स्प्रेअर आणि डस्ट सप्रेशन व्हेईकल खरेदी केली आहेत. सदर वाहने हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करुन पनवेलच्या रहिवाशांसाठी संपूर्ण स्वच्छता, सुरक्षितता वातावरण देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

धूळ दाबणे आणि साफसफाई करण्यासाठी या वाहनांमध्ये वापरण्यात येणारे पाणी मलनिःस्सारण केंद्रातून प्रक्रिया केलेले असल्याने गोड्या, चांगल्या पाण्याची बचत होणार आहे. या दोन्ही गाड्यांवर एकूण २.६६ कोटी रुपये खर्चून पनवेल महापालिकेने पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. पर्यावरणीय गुणवत्ता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सदर वाहने दीर्घकालीन फायदे देणारी ठरणार आहेत. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन