परवानगी न घेता निवडणूक विषयक पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, कमानी लावल्यास कायदेशीर कारवाई  

कल्याण : महापालिकेची परवानगी न घेता, विना परवाना निवडणूक विषयक पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक, झेंडे, कमानी लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिला आहे.

महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, निवडणूक उपायुक्त रमेश मिसाळ, महापालिकेचे सर्व प्रभागांचे सहा.आयुक्त आणि २३-भिवंडी लोकसभा आणि २४-कल्याण लोकसभा परिक्षेत्रातील मंडप कॉन्ट्रॅक्टर्स, मुद्रक, प्रकाशक यांच्या समवेत २३ एप्रिल रोजी आयोजित बैठकीमध्ये आयुक्त इंदु राणी जाखड यांनी सदर इशारा दिला.

प्रिंटींग प्रेस मालकाने उमेदवारांचे, पक्षाचे साहित्य छपाईची ऑर्डर स्वीकारताना २ व्यक्तींच्या ओळखीसह आणि उमेदवाराच्या, पक्षाच्या प्रतिनिधीचे ओळखपत्रासह प्रचार साहित्याची ऑर्डर स्विकारावी. साहित्य छपाई करताना एकूण प्रतींची संख्या आणि प्रत्येक प्रतीवर त्या प्रतीचा अनुक्रमांक असणे आवश्यक आहे. पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक, कमानी प्रिंट करणारे मालक यांनी सुध्दा उमेदवारांचे, पक्षाच्या साहित्य छपाईची ऑर्डर स्वीकारताना २ व्यक्तींच्या ओळखीसह उमेदवाराचे आणि पक्षाच्या प्रतिनिधीच्या ओळखपत्रासह ऑर्डर स्विकारावी. तसेच महापालिकेची रितसर परवानगी घेऊनच पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक, कमानी लावायची कार्यवाही करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. जाखड यांनी उपस्थितांना दिले.

छपाई करण्यात आलेले पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक, कमानी यांच्या प्रत्येक प्रतीवर अनुक्रमांक असणे आवश्यक आहे. तसेच पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक, कमानी यावर महापालिकेची परवानगी क्रमांक, परवानगीची मुदत, प्रकाशक-पब्लिशर्स यांचे नांव आणि भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रितसर परवानगी घेऊनसुध्दा पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक, कमानींवर परवानगी क्रमांक, परवानगीची मुदत, प्रकाशक-पब्लिशर्स यांचे नांव आणि भ्रमणध्वनी क्रमांक नमूद न केल्यास ते अनधिकृत आहेत असे समजून कारवाई करण्यात येईल, असेही आयुवत जाखड यांनी बैठकीत स्पष्ट केले.

ज्या तारखेपर्यंत परवानगी दिली आहे ती मुदत संपताच पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक, कमानी आणि स्ट्रक्चर संबंधित एजन्सीनेच काढावयाचे आहे. पब्लिशर्स तसेच पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक, कमानी, झेंडे बनविणाऱ्या एजन्सी यांनी त्यांचे छपाईची संख्या, साईज आाणि याबाबतचा खर्च आदि माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ यांच्याकडे आणि महापालिका कडे तातडीने सादर करावयाचा आहे. तसेच सभा मंडप कॉन्ट्रॅक्टर यांनी सुध्दा सभा, कार्यक्रम संपताच दुसऱ्या दिवशी उभारलेले स्ट्रक्चर काढून टाकावेत. परवानगी कालावधी संपल्यानंतर कोणतेही पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक, कमानी आढळून आल्यास संबंधिताकडून दंड वसूल करण्यात येईल. त्याचप्रमाणे महापालिका कडून करारावर जाहिरातीच्या जागा घेतलेल्या एजन्सी मालकांनी कोणतीही निवडणूक विषयक जाहिरात ठराविक एका पक्षाला देण्यात येऊ नये. समान न्यायाचे तत्व अवलंबवावे. त्याबाबत उमेदवार, पक्ष यांच्यासोबत झालेला करार, त्यासाठी झालेला खर्च याचा तपशील संबंधिताने महापालिका आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे तातडीने सादर करणे आवश्यक आहे, अशाही सूचना महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी सदर बैठकीत दिल्या. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 प्रदुषण नियंत्रणासाठी मल्टिपर्पज डस्ट सप्रेसशन व्हेईकलचा उतारा