भिवंडी लोकसभा निवडणूक कामासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

नवी मुंबई : ‘भारत निवडणूक आयोग'ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २३-भिवंडी लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया २६ एप्रिल पासून सुरु होणार आहे. मतदान प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे नामनिर्देशन पत्र स्विकारणे आहे. इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ एप्रिल ते ३ मे पर्यंत सुरु राहणार आहे. नामनिर्देशन पत्र छाननी ४ मे २०२४ रोजी होणार आहे. उमेदवारांना नामनिर्देशन भरताना काही अडचण-शंका असल्यास त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व सहाही  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, संबधित तालुक्याचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून शंका दूर करुन घ्याव्यात, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी केले आहे.

उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरताना अचूक भरावे. तसेच नामनिर्देशन भरताना सोबत जोडावयाचे प्रतिज्ञापत्रे भरताना सर्व तपशील व्यवस्थित पूर्ण भरा. उमेदवाराने आणि त्याचे प्रतिनिधी यांचे अलिकडील काळातील काढलेले ६ फोटो नामनिर्देशन अर्जासोबत घेवून येणे अपेक्षित आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी सूचित केले आहे.

मतदान प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे नामनिर्देशन पत्र स्विकारणे होय. याकामी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांची रंगीत तालीम घेण्यात आली. कमीत कमी वेळात नामनिर्देशन पत्र तपासून नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येतील. निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील महत्वाच्या अशा सर्व गोष्टींची पुर्तता झाली असून निवडणूक प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.

निवडणुकीकरिता उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते उघडावे आणि त्या खात्यातून सर्व निवडणूक खर्च करावा. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा ९५ लाख आहे. या खर्चाची स्वतंत्र तपासणी केंद्रीय खर्च निरीक्षक करतील. उमेदवार यांच्या बरोबर केवळ ३ वाहनांना १०० मीटरच्या आत मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. नामनिर्देशन भरताना केवळ उमेदवारासह ५ प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहू शकतात.

दरम्यान, निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणे कामी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. उमेदवाराच्या प्रचारासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता प्रचार केल्यास नियमानुसार कारवाई करणार, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिला आहे.

उमेदवाराच्या प्रचार सभा, रॅली याचे सर्वांचे व्हिडीओ शुटींग करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या निकषावर सर्व परवानग्या देण्यात येतील. कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता कोणत्याही प्रकारे प्रचाराचे साहित्य प्रसिध्द करण्यात येऊ नये. तसेच कोणतीही परवानगी नसताना कोणतेही वाहन वापरता येणार नाही किंवा तसेच कोणताही प्रचार करता येणार नाही. जर नियमांचे आणि कायद्यांचे उल्लघंन झाल्यास संबंधित उमेदवार आणि पक्षावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

नियंत्रण कक्ष सुरु...

निवडणूक कालावधीमध्ये विविध तक्रारी संदर्भात मुख्य निवडणूक कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले असून त्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३१११४ सुरु करण्यात आला असून तो २४ तास सुरू राहणार आहे. तसेच सहाही विधानसभा निहाय १३४- भिवंडी ग्रामीण (०२५२२-२२१२१५), १३५-शहापूर (०२५२-७२९५५००५), भिवंडी (पश्चिम) (०२५२२-२९९६०६), भिवंडी (पूर्व) २९९१६०, कत्याण (पश्चिम) (०२५१-२९९०१२७), 139 मुरबाड (०५२४-२२२१९९) या नंबरवर संपर्क साधावा. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

तुर्भे जनता मार्केट पोलीस चौकीचे उदघाटन