सानपाडा एनएमएमटी बस डेपोतून अखेर बस सेवा सुरु

वाशी : सानपाडा रेल्वे स्थानक बाहेरील बस डेपोतून नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) बससेवा लवकरात लवकर सुरु करण्यात यावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'चे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम व्यवस्थापक योगेश कडुसकर यांच्यकडे १९ एप्रिल २०२४ रोजी निवेदन देऊन केली होती. या मागणीची दखल घेऊन अखेर नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम तर्फे सानपाडा बस डेपोतून १० आणि ११ क्रमांकाची (एनएमएमटी) बससेवा सुरु करण्यात आली आहे.

सानपाडा रेल्वे स्थानक बाहेरील नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन बस डेपोला बसेसच्या फेऱ्यांची प्रतीक्षा लागून राहिली होती. या बस डेपोतून सुटणारी बसे सेवा मागील वर्षभरापासून बंद होती. त्यामुळे सानपाडा रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर प्रवाशांना ऑटो रिक्षा अथवा पायी चालण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. या बस डेपोतून पुन्हा बसेस सुरु कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती. याबाबत प्रवाशांकडून ‘मनसे'कडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याचे योगेश शेटे यांनी निवेदनात नमूद केले होते.

सानपाडा रेल्वे स्थानकालगत महापालिका परिवहन उपक्रमाचा  बस डेपो आहे. सानपाडा येथील रहिवासी प्रवाशांसाठी वाशी, तुर्भे, मुंबई, पनवेल तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी सानपाडा बस डेपो सोईस्कर आहे. सायन-पनवेल महामार्गाला लागूनच सानपाडा बस डेपो असल्याने या ठिकाणाहून प्रतिदिन अनेक बसेसची ये-जा होत होती.या ठिकाणाहून पूर्वी १३ आणि ११ या क्रमांकाच्या दोन बस देखील सुटत होत्या. त्याकरिता बस डेपोमध्ये तीन बस थांबे आहेत. या बस डेपोतून दिवसभरात किमान २० चालक - वाहक विश्रांतीसाठी येत असत. त्यांच्यासाठी परिवहन उपक्रमाने निवारा शेडची सोय करुन दिलेली आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून या डेपोतून एकही बस जात नव्हती. सानपाडा रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर प्रवाशांना ऐन उन्हाळ्यात एक तर पायी अन्यथा ऑटो रिक्षामधून प्रवास करत आपले ठिकाण गाठावे लागत होते. ऑटो रिक्षाचा प्रवास प्रवाशांच्या खिशाला परवडणारा नसल्याने त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. एपीएमसी मार्केट आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. हजारो प्रवासी रेल्वे स्थानकातून मार्केटमध्ये कामानिमित्त जात असतात. तसेच फळ, भाजीपाला आणि धान्य मार्केटमधून नागरिक वस्तू खरेदी करतात. त्यांना परिवहन बस सेवेचा चांगला पर्याय असताना इथून एकही बस सुटत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

नवी मुंबई शहरातील सर्वच रेल्वे स्थानकांच्या बाहेर बस डेपो आहेत. येथून विविध ठिकाणी बसेस जातात. या पार्श्वभूमीवर फक्त सानपाडा रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम दिशेला एनएमएमटी बसेस का जात नाहीत?, असा प्रश्न योगेश शेटे यांनी निवेदनात विचारला होता. सानपाडा रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने सानपाडा येथे लवकरात लवकर बस सेवा सुरु करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी योगेश शेटे यांनी निवेदनातून केली होती. मागणी मान्य न झाल्यास ‘मनसे' स्टाईलने आंदोलन करुन प्रवाशांना न्याय देण्याचे काम ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना' करेल असा इशारा देखील योगेश शेटे यांनी महापालिका परिवहन उपक्रम व्यवस्थापकांना निवेदनातून दिला होता. अखेर योगेश शेटे यांनी दिलेल्या इशाऱ्याची दखल घेऊन सानपाडा बस डेपोतून एनएमएमटी बस सेवा सुरु करण्यात आली असून, सानपाडा रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 बेलापूर विधानसभा मतदार संघात नमो संवाद कॉर्नर सभा