नमुंमपा तर्फे १ हजार वृक्ष लागवड

नवी मुंबई ः २२ एप्रिल रोजी जगभरात वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जात असून पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचारपूर्वक वापर करणे आणि वाढते प्रदुषण रोखून पर्यावरणाचे संतुलन राखणे याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘वसुंधरा दिन' अत्यंत महत्वाचा मानला जातो.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीनेही जागतिक वसुंधरा दिन निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘उद्यान विभाग'च्या वतीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते नेरुळ, सेवटर-२६ येथील झोटींगदेव मैदान याठिकाणी पिंपळवृक्ष रोपाची लागवड करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई, ‘उद्यान विभाग'चे उपायुक्त दिलीप नेरकर, नेरुळ विभाग सहा. आयुक्त अमोल पालवे, कार्यकारी अभियंता राजेश पवार, उद्यान अधीक्षक भालचंद्र गवळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

त्याचप्रमाणे वसुंधरा दिनानिमित्त नवी मुंबईत ९ विविध ठिकाणी १ हजारहून अधिक देशी वृक्षारोपांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे लागवड करण्यात आलेली सर्व वृक्षरोपे देशी प्रजातीची होती. ज्यामध्ये पिंपळ, वड, बहावा, बकुळ, ताम्हण, सोनचाफा, जांभुळ, कदंब अशा देशी वृक्षरोपांचा समावेश होता. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्राधान्याने पक्ष्यांना हवेहवेसे वाटेल अशी फळे आणि फुले असलेली देशी वृक्षरोपे लागवड करण्यात यावीत आणि या माध्यमातून नवी मुंबई शहराच्या जैवविविधतेमध्ये लक्षणीय भर पडेल अशा वृक्षरोपांची लागवड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार फळाफुलांनी बहरणारी वृक्षरोपे लावण्यात येत आहेत.

नेरुळ, सेवटर-२६ येथील झोटींगदेव मैदानाप्रमाणेच वाशी, सेक्टर-१० येथील मीनाताई ठाकरे उद्यान, पामबीच मार्ग सर्व्हिस रस्ता, सानपाडा सेवटर-१० येथील संवेदना उद्यान, आर्टिस्ट व्हिलेज बेलापूर तलावानजिक, निसर्गोद्यान कोपरखैरणे, सेंट्रल पार्क घणसोली, ठाणे-बेलापूर मार्गावर कोपरखैरणे भुयारी मार्गाजवळ, सेवटर-१४ ऐरोली गुरुद्वाराजवळ, दिघा रामनगर येथील बोराले तलावाजवळ अशा ९ ठिकाणी जागेच्या उपलब्धतेनुसार १ हजाराहुन अधिक वृक्षरोपांचे संबंधित विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, उद्यान अधिकारी, स्वच्छता अधिकारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. सदर वृक्षारोपण मोहीम सुरुच असणार आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सानपाडा एनएमएमटी बस डेपोतून अखेर बस सेवा सुरु