विकासाची ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर सादर करणार -सुरेश म्हात्रे

कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघात विकासाच्या नावाखाली मुलभूत प्रश्न मार्गी लागले नसल्याची खंत ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी व्यक्त करत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासाची ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याण मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांची संयुक्त पत्रकार आयोजित करण्यात आली होती. यावेळी उमेदवार सुरेश म्हात्रे बोलत होते. तर ‘कल्याण'च्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी वाढत्या संकुलांमुळे पाणी प्रश्न भीषण झाला असल्याचे सांगितले.

सदर पत्रकार परिषद प्रसंगी ‘काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार गट'चे प्रवक्ते महेश तपासे, ‘राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, पदाधिकारी प्रशांत माळी, ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे'चे उपजिल्हा प्रमुख हर्षवर्धन पालांडे, शरद पाटील, ‘काँग्रेस'चे मुन्ना तिवारी, बॉबी जपजित माटा, शकील खान, विमल ठक्कर, प्रवीण साळवे, ‘राष्ट्रवादी'चे संदीप देसाई, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी  निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटातून काही पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश या प्रश्नाला उत्तर देताना सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक जवळ आली की अशा घटना घडत असतात. निवडणूक आली की सोसाट्याचा वारा येतो, त्यात पालापाचोळा उडून जातो, अशी टीका सुरेश म्हात्रे यांनी केली. प्रत्यक्षात ‘महाविकास आघाडी'मध्ये नाराजी नाही. शिवसेना ठाकरे गटाला त्यामुळे काही फरक पडला नाही किंवा ‘महाविकास आघाडी'ला त्यामुळे काही फरक पडणार नाही, असे सुरेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

‘महायुती'चे उमेदवार कपिल पाटील यांनी राज ठाकरे यांच्या घ्ोतलेल्या भेटीबद्दल सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्यावर टीका केली. कपिल पाटील सध्या कुणा कुणाची भेट घेत आहेत. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीमध्ये कधी कपिल पाटील कुठल्या बिल्डिंगमध्ये, कुठल्या मोहल्ल्यात प्रचाराला गेले होते का? असा सवाल म्हात्रे यांनी केला. पण, आज प्रत्येक बिल्डींगमध्ये, प्रत्येक रस्त्यावर कपिल पाटील दिसत आहेत, याचे सगळे श्रेय मतदारांचे आहे. मतदारांनी कपिल पाटील यांना २  वेळा संधी दिली आणि आता तिसऱ्या वेळेसाठी रस्त्यावर आणले, असा टोलाही सुरेश म्हात्रे यांनी यावेळी लगावला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 नमुंमपा तर्फे १ हजार वृक्ष लागवड