पनवेल मधील उष्माघात नियंत्रण कक्षाची आयुक्तांकडून पाहणी

पनवेल : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस अधिक वाढू लागल्याने. उष्माघात होण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या २३ आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये उष्माघात नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी या उष्माघात नियंत्रण कक्षाची पाहणी करुन आरोग्य वर्धिनी केंद्रातील विविध सेवासुविधांची आढावा घेतला.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमान वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढून उष्माघात होण्याची शक्यता असते. राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाने देखील उष्माघाताच्या अनुषंगाने आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या वतीने उष्माघाताच्या रुग्णांसाठी खबरदारी म्हणून ९ आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये उष्माघात नियंत्रण कक्षांतर्गत वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच उर्वरीत ६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, २ आपला दवाखाना आणि ६ आरोग्य वर्धिनी उपकेंद्रामध्ये उष्माघात नियंत्रण कक्षांतर्गत एअर कुलर बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर सर्व आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका सुविधा देण्यात आली आहे.

उष्माघात नियंत्रण कक्षांमुळे रुग्णांना बाहेरील तापमानापेक्षा कमी तापमानात ठेवून तात्पुरता दिलासा मिळू शकणार आहे. याचबरोबर कोल्ड स्पजिंग आणि उष्णतेमुळे त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ओआरएस कॉर्नर तयार करण्यात आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खारघर ५ आणि तळोजा फेज-२ येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील उष्माघात नियंत्रण कक्षाची पहाणी आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी केली. यावेळी उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, साथरोग वैद्यकिय अधिकारी डॉ. आकाश ठसाळे, त्या त्या ओराग्य वर्धिनी केंद्राचे वैद्यकिय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त डा. रसाळ यांनी आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सोयी सुविधांचा आढावा घेतला. महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

विकासाची ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर सादर करणार -सुरेश म्हात्रे