छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
महापालिका आयुक्त डॉ. शिंदे यांचा विकास प्रकल्पांच्या गुणवत्तेवर भर
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मार्फत सुरु असलेल्या विविध प्रकल्प आणि सुविधांची आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. बांधकाम सुरु असलेले प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करावे आणि प्रकल्प कामाच्या गुणवत्तेकडे काटेकोर लक्ष देण्याच्या सूचना आयुक्त डॉ. शिंदे यांनी यावेळी केल्या. गेले काही दिवस वाढत्या उष्माघाताने एकीकडे नागरिक हैराण झाले असताना आयुक्तांनी मात्र ठरल्या वेळेनुसार भर उन्हात शहरातील विविध विकास प्रकल्पांची पाहणी केल्याने नवी मुंबईकर देखील अचंबित झाले आहेत.
महिनाभरापूर्वी नवी मुंबई महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारलेल्या डॉ. कैलास शिंदे यांनी महापालिकेच्या कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता आणण्याच्या अनुषंगाने तसेच सुरु असलेल्या प्रकल्पांची कामे गुणवत्तापूर्वक आणि विहित कालावधीमध्ये होत आहेत की नाहीत याची तपासणी सुरु केली आहे. त्याकरिता त्यांनी शहरातील विविध नोडस्ना प्रत्यक्ष भेटी देत, त्या क्षेत्रात सुरु असलेल्या विविध विकास प्रकल्पांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सायन्स पार्क, वंडर्स पार्क, नेरुळ रुग्णालय, ज्वेल ऑफ नवी मुंबई, विष्णुदास भावे नाट्यगृह-तेथील ग्रंथालय, तुर्भे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प-तेथील सी अँड डी वेस्ट प्रकल्प, घणसोली-ऐरोली नियोजित खाडीपुल, कोपरखैरणे येथील आकांक्षी शौचालय, टर्शिअरी ट्रिटमेट पलान्ट, निसर्गोद्यान, स्वच्छता पार्क, मियावाकी शहरी जंगल अशा विविध प्रकल्प आणि सुविधांची पाहणी केली.
सदर पाहणी दौऱ्यात आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी काही विकास प्रकल्पांसंदर्भात मौलिक सूचना केल्या. त्यात टर्शिअरी ट्रिटमेंट पलान्ट मधील पुर्नप्रक्रियाकृत पाण्याचा पूर्णतः वापर करणे, कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणीच ओला, सुका आणि घरगुती घातक अशाप्रकारे वर्गीकरण करणे, फळे-फुलांकरिता पक्षी आकर्षित होतील आणि शहराच्या जैवविविधतेत भर पडेल अशा देशी प्रजातीच्या झाडांची प्राधान्याने लागवड करण्याची सूचना आयुक्त शिंदे यांनी केली.
सध्याच्या वाढत्या उष्णतेच्या अनुषंगाने नागरिकांनी आरोग्य विषयक घ्यावयाच्या काळजीबाबत व्यापक जनजागृती करणे, बालमृत्यू होऊ नयेत यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासोबतच रक्तक्षयाचे (ॲनेमिया) प्रमाण कमी करण्यासाठी विशेष जनजागृतीवर भर देण्यात यावा. तसेच ग्रंथालयाची रचना करताना डिजीटल युगाला साजेशी ई-लायब्ररीची उभारणी करण्यात यावी.
-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका.