खारघर कॉलनी फोरम पदाधिकाऱ्यांचा शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश

खारघर : ‘खारघर कॉलनी फोरम'च्या अध्यक्षा तथा माजी नगरसेविका लीना गरड यांनी ‘कॉलनी फोरम'च्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उध्दव  ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई मधील शिवसेना भवन येथे हाती शिवबंधन बांधून शिवसेना (उबाठा) मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना (उबाठा) कोकण संपर्क नेते सुभाष देसाई, रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजोग वाघेरे, रायगड जिल्हा सल्लागार  बबनदादा पाटील आदी उपस्थित होते.

‘खारघर कॉलनी फोरम'च्या माध्यमातून समाजकार्य करीत असताना खारघर वसाहत मधील सामाजिक कार्याची आवड निर्माण असलेल्या अनेक व्यक्ती कॉलनी फोरम सोबत जोडल्या गेल्या आहेत.  

पनवेल महापालिका निवडणूक पूर्वी लीना गरड यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता. दांडगा जनसर्पक असल्यामुळे ‘भाजपा'ने लीना गरड यांची खारघर शहर महिला भाजपा अध्यक्ष पदी नियुक्ती केली. त्यानंतर लीना गरड यांनी महापालिका निवडणुकीत बहुमताने विजय प्राप्त केला. महापालिका सभागृहात लीना गरड यांनी महापालिका महिला-बाल कल्याण समिती सभापती म्हणून काम केले.

दरम्यान, पनवेल महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी २०१६ पासून महापालिका क्षेत्रात दुहेरी मालमत्ता कर लागू केला. या दुहेरी मालमत्ता कर बाबत लीना गरड यांनी नाराजी व्यवत केली होती. तसेच लीना गरड यांनी ‘पनवेल'च्या महापौर पदाची मागणी  केल्याची चर्चा रंगली होती. मात्र, लीना गरड यांनी पनवेल महापालिका द्वारे नागरिकांना लावण्यात आलेल्या दुहेरी मालमत्ता कराचा प्रश्न  उपस्थित करुन उघडपणे सत्ताधाऱ्यांचा विरोधात आवाज उठविल्यामुळे ‘भाजपा'ने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. लीना गरड यांनी मालमत्ता कर आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा आदी वसाहतीत बैठक घेवून आवाज उठविला. त्यामुळे सिडको वसाहतीतील रहिवाशी कॉलनी फोरम सोबत जोडत गेले. आजही पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतीत लीना गरड यांच्या नावाचा बोलबाला आहे.  सिडको वसाहत मध्ये ‘कॉलनी फोरम'ला मानणारा मोठा वर्ग निर्माण झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी शिवसेना (उबाठा) द्वारे ‘कॉलनी फोरम'कडे लोकसभा निवडणुकीत पाठिंब्याची मागणी करण्यात आली होती.

या मागणीची दखल घेऊन लीना गरड यांनी ‘कॉलनी फोरम'चे समन्वयक मधू पाटील, ॲड. बालेश भोजने, मनोज सोमवंशी, मंगेश आढाव, ॲड. समाधान काशीद यांच्यासह कामोठे, तळोजा, कळंबोली, खारघर आदी सिडको वसाहत मधील पाचशे पेक्षा अधिक कॉलनी फोरम सदस्य आणि काही सामाजिक संघटना सदस्य यांना सोबत घेत शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश करुन हाती शिवबंधन बांधले.  

खारघर ग्रामपंचायतीत खारघर वसाहत मधील काही नागरिकांनी प्रतिनिधीत्व करावे यासाठी लीना गरड यांनी खारघर ‘कॉलनी फोरम'ची स्थापना करुन २०१४ साली झालेल्या खारघर ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल उभे केले. या निवडणुकीत ‘कॉलनी फोरम'च्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. मात्र, खारघर ग्रामपंचायत निवडणुकीत  ‘कॉलनी फोरम'च्या सर्व उमेदवारांना जवळपास १० हजार मते मिळाली. त्यामुळे कॉलनी विरुध्द ग्रामस्थ असे दोन गट पडले. विशेष म्हणजे खारघर ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने लीना गरड या करोडपती उमदेवार असल्याचा आरोप करुन त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, खारघर ग्रामपंचायत निवडणुकीत करोडपती उमदेवार असल्याच्या आरोपामुळे लीना गरड यांचे नाव सर्वत्र झाले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शहरात कचरा न टाकण्याचे फलक लावून बिट मार्शल नियुक्त करा -आयुवत राव