कामगार, अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

ठाणे : महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. तसेच निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची  सुविधा देण्यात आली असून, याबाबतचे शासन परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात या निवडणुकीचे मतदान १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे २०२४ रोजी पाच टप्प्यात होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे. मतदान दिनी देण्यात येणारी भरपगारी सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या, संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे.

मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येणार आहे, अशी तंबीही राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशाद्वारे देण्यात आली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला ‘केडीएमसी'कडून केराची टोपली