मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला ‘केडीएमसी'कडून केराची टोपली

कल्याण : २७ गावातील नागरिकांकडून जुन्या दराने कर आकरणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करुन देखील कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन २७ गावातील नागरिकांकडून नवीन दरानेच कर वसुली करत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, नवीन दराने कर न भरणाऱ्या नागरिकांना मालमत्ता जप्तीच्या नोटिस ‘केडीएमसी'मार्फत दिल्या जात आहेत. त्यामुळे केडीएमसी प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असून जुन्या दराने कर आकारणी करण्याची मागणी २७ गावातील नागरिक सत्यवान म्हात्रे यांनी ‘केडीएमसी'कडे पत्राद्वारे केली आहे.  

२७ गावातील नागरिकांवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने अतिरिक्त कर लावलेला आहे. त्यासंदर्भात अनेकवेळा पत्रव्यवहार, अर्ज, विनंत्या, आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. परंतु, आजपर्यंत त्याचे इच्छित फळ मिळालेले नाही. धरणे आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती गठित केली. या समितीने अहवाल देखील सादर केलेला आहे. परंतु, त्याच्या काही फायदा झालेला नाही. गत महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ गावातील ग्रामस्थांची सभा घेतली होती. यावेळी २७ गावातील कर आकारणी सन २०१७-२०१६ आणि सन २०१६-२०१७ या प्रमाणे करण्यात यावी, अशी घोषणा वजा सूचना केली होती. याप्रसंगी मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्थानिक आमदार राजू पाटील, महापालिका आयुक्त यांंच्यासह इतर सर्व नेते मंडळी उपस्थित होती. या सर्वाच्या समोर मुख्यमंत्र्यांनी सदरची घोषणा केलेली आहे.

अशाप्रकारे वस्तुस्थिती असताना, केवळ जी.आर. निघाला नाही म्हणून कर आकारणी मध्ये कोणतेही अपेक्षित बदल केलेले नाहीत. एके ठिकाणी मुख्यमंत्री कर आकारणी मागील वर्षीप्रमाणे करुन वसूल केला जाणार असल्याचे सांगतात. तर दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी लागू केलेल्या नवीन दराने कर आकारणी करुन कर वसुली करत फिरत आहेत. यामुळे २७ गावातील जनता संभ्रमात पडलेली आहे. महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी जप्तीच्या नोटीसा घेवून फिरत आहेत. त्यामुळे एक वेगळीच दहशत गावकऱ्यांच्या मनात निर्माण झालेली आहे.

सदर प्रकार कुठेतरी थांबणे आवश्यक आहे. त्यामुळे याचा गांभिर्यपुर्वक विचार करण्यात यावा आणि संबंधिताना योग्य ते कार्यवाहीचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी केडीएमसी प्रशासनाकडे केली आहे. -सत्यवान म्हात्रे, ग्रामस्थ-२७ गाव.

२७ गावातील जुन्या ॲसेसेमेंट नुसार कर आकरणीनुसार मालमत्ता बीलाची आकरणी होते. त्यानुसार याप्रकरणी जैसे थे प्रकरण असून शासनाकडून बैठकीचे इतिवृत्त आल्यानंतर त्या संदर्भात कार्यवाही करण्यात येईल. २७ गावातील नवीन मालमत्ता कर आकरणी प्रकरणे ॲसेसमेंट नुसार नवीन प्रचलित दराने करण्यात येत आहे.

-स्वाती कुलकर्णी, कर निर्धारक तथा संकलक, उपायुक्त-केडीएमसी. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 जलपर्णीमुळे उल्हास नदीतील पाणी प्रदूषित