‘चित्रे, रांगोळी'द्वारे विद्यार्थ्यांकडून मतदानाचा संदेश

नवी मुंबई : ‘चला, मतदान करण्यास पुढे येऊया-आपल्या देशाचा विकास करुया', अशी मतदान विषयक जनजागृती करणारी घोषवाक्ये लिहून त्याला अनुरुप चित्रे आणि रांगोळी रेखाटत नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी आपापल्या संकल्पना वापरत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

येत्या २० मे २०२४ रोजी २५-ठाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान होत असून त्या अनुषंगाने १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या वतीने मतदार जनजागृतीचा स्वीप कार्यक्रम व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे.

स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती करणारे विविध उपक्रम सर्व स्तरांवर राबविण्यात येत असून देशाचे उद्याचे नागरिक असणाऱ्या विद्यार्थ्यामार्फत त्यांच्या पालक आणि नातेवाईकांपर्यंत मतदान करुन लोकशाहीतील हक्क बजावण्याचा संदेश प्रसारित केला जात आहे. याकरिता शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नानाविध उपक्रम नाविन्यपूर्ण रितीने राबविण्यात येत आहेत.

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीप कार्यक्रमांतर्गत शालेय पातळीवर मतदान जनजागृतीविषयक चित्रे आणि रांगोळी काढण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. महापालिकेच्या ५७ प्राथमिक आणि २३ माध्यमिक अशा एकूण ८० शाळांसह २०० हुन अधिक खाजगी शाळांमध्येही चित्रे आणि रांगोळीच्या माध्यमातून मतदान विषयक जनजागृती उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या सबलीकरणासाठी मतदान करावे, असे आवाहन करणाऱ्या संकल्पना चित्र आणि रांगोळीच्या माध्यमातून रेखाटल्या. अनेक शाळांमध्ये पालकांनीही भेटी देऊन या विद्यार्थ्यांचे कौतुक करुन त्यांना प्रोत्साहीत केले. तसेच शिक्षकांमार्फत मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांचीही प्रशंसा करण्यात आली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 कामगार, अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी