भर उकाड्यात महावितरणचे अघोषित भारनियमन

ठाणे : सोमवारपासून प्रचंड उकाड्यानं ठाणेकर हैराण झाले असतानाच महावितरणकडून अघोषित भारनियमन सुरू केले की काय अशी शंका यायला लागली आहे. ठाण्यातील खोपट, उथळसर, कोलबाड, श्रीरंग सोसायटी, वृंदावन सोसायटी चेंदणी कोळीवाडा, स्टेशन रोड परिसरात अवेळी वीजपुरवठा दीड ते दोन तास अधूनमधून खंडीत होत असल्याने उकाड्याने हैराण झालेल्या ठाणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान कळवा येथील ट्रान्सफॉर्ममध्ये बिघाड झाल्याने अर्ध्या ठाण्यासह नवी मुंबईचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

सोमवारपासून राज्यात उष्याने डोके वर काढून तापमान 40 अंशाच्याही पुढे जावून अंगाची लाहीलाही होत असताना महावितरणकडून अघोषित केल्या जाणार्‍या भारनियमनामुळे ठाणेकरांच्या हालात भर पडत आहे. सोमवारपासून एकीकडे उकाडा वाढतोय तर दुसरीकडे कोलबाड, उथळसर परिसरात सकाळी 7 ते 9, खोपट ते हंसनगर भागात 10 12 तर दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत सिडको, चेंदणी कोळीवाडा आणि स्टेशन रोड परिसरात वीज पुरवठा खंडीत होत असल्याने व्यापारी वर्गाचेही मोठे नुकसान होताना दिसत आहे. अशाच पद्धतीने पाचपाखाडी, चंदनवाडी, राम मारुती रोड, गोखले रोड परिसरातील अनेक तास वीज पुरवठा खंडीत झाल्याचे निदर्शनास आले आहे.

उन्हाच्या काहीलीतून थंडावा मिळावा म्हणून थंड पाण्याची बाटली घेण्यासाठी ग्राहक दुकानाकडे धाव घेतो. मात्र तास, दोन तास वीजपुरवठा खंडीत झाल्याने साध्या पाण्याचा घोट घशाखाली उतरवावा लागतो. तर दुसरीकडे फळभाज्या, दुध, अन्नपदार्थ टिकविण्यासाठी फ्रीजचा वापर करणार्‍या व्यापार्‍यांना मोठा फटका बसताना दिसत आहे. तर अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्याने विद्युत उपकरणांमध्येही बिघाड होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘चित्रे, रांगोळी'द्वारे विद्यार्थ्यांकडून मतदानाचा संदेश