पाडवा रॅलीत मतदान जनजागृतीचे रंग

ठाणे : सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने, स्वीप पथक प्रमुख सहायक आयुक्त सोपान भाईक यांच्या नेतृत्वामध्ये स्वीप पथकातील सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत २५-ठाणे लोकसभा मतदार संघ अंतर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ ,स्वीप पथक विविध माध्यमातून मतदान जनजागृती करीत आहे. मतदारसंघामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे व वेगवेगळ्या औचित्यांची उपयुक्तता साधली जात आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल, असा विश्वास प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांनी व्यक्त केला आहे.

९ एप्रिल रोजी दिवस मराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. या दिवसाचे औचित्य साधून गुढीपाडवा, मतदान वाढवा उपक्रम १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ, स्वीप पथक यांनी "No Voter to be Left Behind"  या संकल्पनेतून राबविला.

ठाणे येथे गुढीपाडवा निमित्त विविध प्रकारच्या ‘शोभायात्रां'चे (रॅली) आयोजन करण्यात आले होते. यावर्षी ठाणेकरांना पाडवा रॅलीत मतदान जनजागृतीचे रंग पाहायला मिळत होते. पहाटे ६ वाजल्यापासूनच संपूर्ण स्वीप पथक उपस्थित होते. सदर ठिकाणी रॅलीमध्ये एकूण ४७ चित्ररथ सहभागी  झाले होते. या रॅलीमध्ये १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मतदान जनजागृतीकरिता स्वीप पथकाचे चित्ररथ शोभायात्रा रॅली सहभागी झाले होते. या चित्ररथावर १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघाचे बॅनर पोस्टर होते. पूर्ण चित्ररथ फुलांनी सजविला होता आणि उत्तम असे प्रेरणात्मक सजावट करण्यात आली होती. चित्ररथावर मतदान जनजागृती संबंधित सोप्या भाषेत समजतील, असे प्रेरक संदेश प्रदर्शित करण्यात आले होते.

मतदान जनजागृती चित्ररथ रॅलीवर मतदान जनजागृती संबंधित सुंदर गाण्यांची मैफल सुरु होती. तसेच रथावर विविध सांस्कृतिक वेशभूषा केलेले विद्यार्थी होते."No Voter to be Left Behind"  या संकल्पनेमधून विद्यार्थ्यांनी वेशभूषा केली होती. सर्वाना समान मताधिकार असून कोणताच घटक मतदानापासून वंचित राहणार नाही, असा प्रेरक संदेश विद्यार्थी त्यांच्या वेषभूषेतून चित्ररथाद्वारे देत होते. मतदानादिवशी प्रत्येक नागरिकाने मतदान अधिकार बजावला पाहिजे,  प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे संदेश उपस्थित नागरिकांपर्यंत पोहचविण्यात स्वीप पथक यशस्वी ठरले.

‘चित्ररथ रॅली'मध्ये मी मतदान करणार, आपल्या देशाचे भवितव्य घडविणार, आणि भविष्य घडवायला आम्ही आज आलो.. तुम्ही सुध्दा २० मे २०२४ ला मतदानाला या..., अशा प्रकारच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ‘चित्ररथ रॅली'मध्ये महत्वाचा वेगळा उपक्रम म्हणजे या चित्ररथ रॅली पाहणाऱ्या आणि सहभागी होणाऱ्या नागरिकांना मी मतदान करणारच...आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज राहा...या आशयाचे मजकूर असलेले आणि त्यावर मतदान २० मे, २०२४ असे दर्शविणारे माहितीपत्रकाचेही वितरण करण्यात आले. तलावपाळी येथून सकाळी ७ वाजता  निघालेल्या रॅलीचा चरई, हरीनिवास मार्गे आणि नौपाडा मार्गे गांवदेवी मैदान येथे सकाळी ११.३० वाजता समारोप करण्यात आला.

सदर रॅलीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी एक टीम म्हणून चांगले काम केल्याने मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल. त्या अर्थाने मतदान जनजागृती रॅली यशस्वी ठरेल, असा विश्वास प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अनधिकृत बांधकामांवर १५ एप्रिल पासून पुन्हा कारवाई