आर टी ई अंतर्गत प्रवेश नाकारणाऱ्या शाळेवर कारवाईची मागणी
नवी मुंबई -: आर टी ई २००९ कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे.मात्र नेरूळ, सेक्टर १८ मधील विद्या भवन शाळा आर.टी.ईअंतर्गत विद्यार्थांना प्रवेश नाकारात आहे. त्यामुळे या परिसरातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्याना ही शाळा शिक्षणापासून वंचित ठेवत असल्याने या शाळेवर कारवाई करावी.अशी मागणी माजी ब प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांनी मनपा शिक्षण विभागाकडे केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र (जी.आर.) परिपत्रकानुसार कोणताही विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आर.टी.ई. अंतर्गत योजना राबविली आहे. मध्यम व सर्वसाधारण गटातील पालक मुलांचे ऑनलाईन प्रवेशिका भरून मुलांना आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश घेतात.
मात्र विद्या भवन शाळा, सेक्टर-१८ नेरुळ ही शाळा आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश प्राप्त झालेल्या मुलांना तसेच काही विद्यार्थी इयत्ता चौथी आणि पाचवी वी मध्ये आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे. याबाबत काही पालकांनी मुख्याध्यापकांना जाब विचारला असता तुमचे पाल्य 'इंग्रजी माध्यमातून सेमी इंग्रजी मध्ये शिकवा' तसेच इंग्रजी माध्यमे शिकवायचे असेल तर त्याची फी भरावी लागेल. असे उत्तर येथील मुख्याध्यापकांनी पालकांना दिल्याचा आरोप होत आहे. शासनाकडून आर.टी.ई. अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश प्राप्त होऊन सुद्धा विद्या भवन शाळा ही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. तर विद्या भवन शाळेने या पुर्वी सुद्धा असेच आर.टी.ई. अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले होते त्यावेळी त्याच्या विरोधात पालकांनी मनपा शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी नमतेपणा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता.मात्र शाळेने पुन्हा जूनेच धोरण अवलंबले असून आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारला जात आहे.त्यामुळे गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या अशा मुजोर शाळेविरोधात कडक कारवाई करून आर.टी.ई. अंतर्गत विद्यार्थ्यांना व पालकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी माजी ब प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांनी मनपा शिक्षण विभागाकडे केली आहे.