डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करा

नवी मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करा, अशी विनंती ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'च्या वतीने सीवुडस्‌ मधील शाळा आणि मॉल्सना पत्र देऊन करण्यात आली आहे.

१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताचे महान असे संविधान लिहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठा लढा दिला. डॉ. आंबेडकर जगातील महान अर्थतज्ञ होते. मंत्री म्हणून स्त्रिया, कामगार यांचे अनेक प्रश्न डॉ. बाबासाहेबांनी सोडवले. तसेच भारतीय कायद्यात आमूलाग्र बदल घडवून आणले.

अशा महान व्यक्तीची जयंती साजरी केली पाहिजे, अशी विनंती ‘मनविसे'च्या शिष्टमंडळाने सीवुडस्‌ मधील नेक्सस ग्रँड सेंट्रल मॉल, सेवटर-४८ मधील डी.ए.व्ही पब्लिक स्कूल, सेक्टर-४२ अ मधील डॉन बॉस्को स्कुल, सेक्टर- ४४ मधील एस. एस. हायस्कुल, सेवटर-५० येथील महापालिका शाळा (सीबीएसई), सेक्टर- ५२ मधील डी.पी.एस स्कुल, आदिंकडे पत्र देऊन केली आहे. 

अशा पध्दतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव साजरा केल्यास तरुणांपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, कार्य पोहोचण्यास मदत होईल, असे ‘मनविसे'ने संबंधितांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

याप्रसंगी ‘मनविसे'च्या शिष्टमंडळात सीवुडस्‌ प्रभाग क्र.४०  विभाग अध्यक्ष अविनाश शिंदे, विभाग सचिव शंकर घोंगडे-पाटील, उपविभाग अध्यक्ष मयंक घोरपडे, अमित टोंपे, आदिंचा सहभाग होता. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘मावळ'चा गड पुन्हा आम्हीच राखणार -ना. उदय सामंत