‘मावळ'चा गड पुन्हा आम्हीच राखणार -ना. उदय सामंत

उरण : ‘कोरोना'च्या काळात व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे नेत्यांशी, जनतेशी संवाद साधणाऱ्या उध्दव ठाकरे यांचा सुपडा साफ आम्ही केला आहे. त्यामुळे त्यांनी कितीही टीका टिप्पणी केली तरी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ‘महायुतीे'चे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या रुपाने पुन्हा एकदा ‘मावळ'चा गड आम्हीच राखणार आहोत, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री तथा ‘रायगड'चे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यवत केला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील ‘भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुती'चे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ जेएनपीए बंदर वसाहती मधील मल्टीपर्पज हॉल येथे ७ एप्रिल रोजी ‘महायुती'चे पदाधिकारी-प्रमुख कार्यकर्ते यांच्यात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता टिका केली.

श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून दोन वेळा नेतृत्व केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार मध्ये कोणत्या प्रकारचे जातीपातीचे राजकारण न करता जनहिताची अनेक कामे सरकारच्या माध्यमातून मार्गी लावली आहेत. त्यामुळे त्यांना ७ वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. आज तेच ‘मावळ'चे खासदार श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा ‘महायुती'च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यांचा विजय निश्चितच आहे. त्यासाठी नावारुपाला नसणाऱ्या ‘महाविकास आघाडी'च्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागणे गरजेचे आहे, असे आवाहन ना. उदय सामंत यांनी उपस्थितांना केले.

‘मावळ'मध्ये भाजप महायुती एक जीव झाली आहे. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे या मतदारसंघात तिसऱ्यांदा विजयाची पताका फडकवतील, असा विश्वास लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. तसेच श्रीरंग बारणे यांची धन्युषबाण निशाणी घराघरात पोहोचविण्यासाठी ‘महायुती'च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात सक्रिय व्हावे, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उरण, मावळ लोकसभा मतदारसंघात विविध प्रकारची विकास कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावली आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे. मी केव्हाच नावासाठी काम केले नाही. जनतेच्या हितासाठी काम करत आहे आणि यापुढे देखील करणार आहे. ‘मावळ'ची जनता मला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भरघोस मताधिक्याने निवडून देणार असल्याचा विश्वास ‘महायुती'चे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

यावेळी ‘उरण'चे आमदार महेश बालदी, ‘पनवेल'चे आमदार प्रशांत ठाकूर, ‘आरपीआय'चे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, ‘राष्ट्रवादी महिला काँग्रेस'च्या जिल्हाध्यक्षा उमा शिंदे, अतुल पाटील यांनी आपले विचार व्यक्त करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान पदावर कार्यरत करण्यासाठी ‘मावळ'मधील ‘महायुती'चे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी प्रचारात सक्रिय व्हावे, असे आवाहन केले.

याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ‘शिवसेना'चे प्रदेश सदस्य रुपेश पाटील, जिल्हाप्रमुख संतोष भोईर, उपजिल्हाप्रमुख अतुल भगत, ‘भाजपा'चे तालुकाध्यक्ष रवि भोईर, महिला तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, ‘राष्ट्रवादी'चे तालुकाध्यक्ष परिश्चित ठाकूर, वैजनाथ ठाकूर, संतोष विचारे यांच्यासह ‘महायुती'चे आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘भाजप'कडून पूर्वी पक्ष फोडाफोडी, आता घरफोडी