‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या सेवा वेळेत ८ एप्रिल पासून बदल

नवी मुंबई : बेलापूर ते पेंधर (नवी मुंबई मेट्रो मार्ग-१) दरम्यान धावणाऱ्या ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या सेवा वेळेमध्ये ८ एप्रिल २०२४ पासून वाढ करण्याचा निर्णय सिडको महामंडळ तर्फे घेण्यात आला आहे. ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या वेळेत वाढ झाल्यावर या ‘मेट्रो रेल्वे' मधून प्रवास करणाऱ्या खारघर आणि तळोजा मधील प्रवाशांची वाहतुक समस्या दूर होणार आहे.

‘सिडको'च्या निर्णयानुसार बेलापूर मेट्रो स्थानक येथून सुटणाऱ्या ‘मेट्रो रेल्वे'च्या सेवा वेळेत १ तासाची तर पेंधर येथून सुटणाऱ्या ‘मेट्रो रेल्वे'च्या सेवा वेळेत अर्ध्या तासाची वाढ करण्यात येणार आहे. आठवड्यातील सर्व दिवशी वाढीव सेवा वेळेनुसार ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे' धावणार आहे.

 स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून १७ नोव्हेंबर २०२३ रोजी सिडको महामंडळाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर बेलापूर ते पेंधर (तळोजा) दरम्यानची नवी मुंबई मेट्रो रेल्वे सेवा सुरु केली. नवी मुंबई मेट्रो रेल्वे सेवा सुरु होण्यापूवी तळोजा वसाहत मधील प्रवाशांना एनएमएमटी बस अथवा दुप्पट भाडे देवून खाजगी वाहनाने तळोजा ते बेलापूर दरम्यान प्रवास करावा लागत होता. बेलापूर-पेंधर मेट्रो रेल्वे सेवामुळे तळोजा आणि खारघर उपनगरातील प्रवाशांची वाहतुकीची समस्या काही प्रमाणात दुर झाली आहे. मात्र, नवी मुंबई मेट्रो रेल्वे सेवा सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरु राहत आहे. रात्री १० नंतर नवी मुंबई मेट्रो रेल्वे सेवा बंद केली जाते.


रात्री १० नंतर खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा मार्गांवर बस सेवा वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे  खारघर सेक्टर-३४, ३५ तसेच तळोजा मधील प्रवाशांना रात्री १० नंतर खाजगी वाहने अथवा रिक्षाने प्रवास करताना दुपट पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे सिडको प्रशासनाने रात्री १२ पर्यंत नवी मुंबई मेट्रो रेल्वे सेवा सुरु ठेवावी, अशी मागणी तळोजा मधील नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेवून सिडको तर्फे ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बेलापूर ते पेंधर दरम्यान धावणाऱ्या ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या सेवा वेळेमध्ये वाढ करण्यात आल्यानंतर बेलापूर मेट्रो स्थानक येथून सकाळी ६ वाजता पहिली मेट्रो रेल्वे पेंधर दिशेने आणि पेंधर येथून बेलापूर दिशेने रवाना होणार आहे. तर बेलापूर मेट्रो स्थानक येथून शेवटची मेट्रो रेल्वे रात्री ११ वाजता पेंधर दिशेने आणि तर पेंधर मेट्रो स्थानक येथून शेवटची मेट्रो रेल्वे रात्री १०.३० वाजता बेलापूर दिशेने सुटणार आहे.

नवी मुंबई मेट्रो रेल्वे मधून दररोज १२ हजार पेक्षा अधिक प्रवाशी प्रवास करीत आहेत. ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'चे भाडे १ ते ११ किलोमीटर दरम्यान १० ते ४० रुपये आहे. तर मुंबई परिसरात सुरु असलेल्या ‘मेट्रो रेल्वे'चे भाडे १ ते ३ किलोमीटर अंतरासाठी १० रुपये, ३ ते १२ किलोमीटर अंतरासाठी २० रुपये आणि १२ ते  १८ किलोमीटर अंतरासाठी ३० रुपये आकारले जात आहे. मुंबई शहरातील ‘मेट्रो रेल्वे'च्या तुलनेत ‘नवी मुंबई मेट्रो'चे तिकीट दुप्पट असून, मुंबई मेट्रो तिकीट दरानुसार ‘नवी मुंबई मेट्रो'चे तिकीट आकारावे, अशी मागणी ‘नवी मुंबई मेट्रो' प्रवाशी वर्गाकडून करण्यात आली आहे. ‘नवी मुंबई मेट्रो'च्या प्रवाशी संख्येत वाढ व्हावी, यासाठी सिडको प्रशासनाकडून पेंधर ते बेलापूर दरम्यान धावणाऱ्या ‘मेट्रो रेल्वे'चे भाडे कमी करण्यासंदर्भात विचार विनिमय सुरु आहे. मुंबई आणि नवी मुंबई मेट्रो तिकीट दराविषयी चर्चा करुन मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न सिडको मार्फत करण्यात येत आहे. मात्र, याविषयी एकमत होत नसल्यामुळे योग्य विचार विनिमय करुन पुढील काही दिवसात ‘नवी मुंबई मेट्रो'चे तिकीट दर कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असे सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या सेवा वेळेमध्ये वाढ करण्याची मागणी मेट्रो रेल्वे प्रवांशांनी वारंवार केली आहे. या मागणीची दखल घेऊन येत्या ८ एप्रिल २०२४ पासून  ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या सेवा वेळेमध्ये वाढ करण्याचा महत्वपूर्ण, प्रवाशी हिताय निर्णय  सिडको महामंडळ तर्फे घेण्यात आला आहे.  - प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी  - सिडको. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी मधील सार्वजनिक रस्त्यावर विकासकाची मक्तेदारी?