मतदान ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्ड यांचा पर्याय

ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नाही अथवा वेळेत मिळवू शकणार नाहीत, अशा मतदारांसाठी अन्य छायाचित्रासह असणारी ओळखपत्र पर्याय असणार आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

काही मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसल्यास अथवा त्यांच्या ओळखपत्रामध्ये काही शुध्दलेखनाच्या चुका, छायाचित्र वगैरे जुळत नसल्यामुळे मतदाराची ओळख प्रस्थापित करणे शक्य नसल्यास मतदाराला भारत निवडणूक आयोगाने परिच्छेद ७ मध्ये नमूद केलेली ओळखपत्रे पर्याय असणार आहेत. यात आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक/पोस्ट ऑफीस द्वारे देण्यात आलेले फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआय तर्फे देण्यात आलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्ताऐवज, केंद्र/राज्य सरकार/पीएसयू/पब्लिक लिमिटेड कंपनी कर्मचाऱ्याचे छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार/एमएलसी यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण भारत सरकारतर्फे मिळालेली दिव्यांग आयडी कार्ड (युडीआयडी) यांचा समावेश आहे.

लोकप्रतिनिधी कायदा १९५० मधील कलम २०ए अंतर्गत मतदारयादीत नोंदणी केलेले परदेशी मतदार त्यांच्या भारतीय पासपोर्ट मधील तपशिलाच्या आधारे ओळखले जाणार आहेत, असे ठाणे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.

मतदान ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्ड देखील मतदान केंद्रावर सादर करण्याचा मतदारांना पर्याय असला तरी, मतदारांनी मतदार ओळखपत्रे तयार करुन घेण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन ठाणे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पनवेल महापालिका, विसपुते कॉलेजच्या माध्यमातून टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा