‘मनसे'तर्फे लवकरच १०० शाळा-महाविद्यालयांना राज्यगीताची प्रतिमा भेट

नवी मुंबई : मराठी भाषा गौरव दिन निमित्ताने ‘नवी मुंबई मनसे'च्या वतीने १०० शाळा-महाविद्यालयांना राज्यगीताच्या प्रतिमा भेट देण्यात येणार आहेत. जे गीत ऐकताच मराठी जनतेचा ऊर अभिमानाने भरुन येतो, जगातील प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांचे उभे राहते अशा ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्यगीताच्या प्रतिमा शाळा-महाविद्यालयांना ‘मनसे'च्या वतीने भेट देऊन राज्यगीत शाळा-महाविद्यालयांच्या दर्शनी भागात लावण्याची विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘मनसे'चे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली आहे.

२७ फेब्रुवारी म्हणजेच ज्येष्ठ कविवर्य कुसुमाग्रजांची जयंती महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मनसे नेते आणि ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'चे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना राज्यगीत दर्शनी भागात लावण्याकरिता शासन आदेश काढण्यासंदर्भात निवेदन दिलेले आहे. याच निवेदनाच्या अनुषंगाने ‘मनसे'च्या वतीने नवी मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना राज्यगीताच्या प्रतिमा भेट देऊन त्या प्रतिमा शाळा आणि महाविद्यालयांच्या दर्शनी भागात लावण्याची विनंती करण्यात येणार आहे. तसेच नवी मुंबईतील विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये सुध्दा ‘मनसे'च्या वतीने राज्यगीताच्या प्रतिमा भेट देण्यात येणार असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले.

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा कै. गीतकार राजा बढे लिखित आणि कै. शाहीर कृष्णराव साबळे यांनी गायलेल्या या गीताला गेल्या वर्षी १ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यगीताचा दर्जा शासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्यगीताचे महत्त्व भावी पिढ्यांना-विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी आणि त्यांना आपल्या अत्यंत प्रेरणादायी राज्यगीताचा उचित सन्मान राखण्याची सवय लावण्यासाठी ‘मनसे'च्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यगीताच्या प्रतिमा शाळा महाविद्यालयांना भेट देण्यात येणार असल्याचे ‘मनविसे'चे नवी मुंबई अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी सांगितले. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पक्षाने सांगितल्यास लोकसभा निवडणूक लढवीन -सुषमा अंधारे