पक्षाने सांगितल्यास लोकसभा निवडणूक लढवीन -सुषमा अंधारे

डोंबिवली : मला पक्षाने सांगितले तर आगामी लोकसभा निवडणुकीत उभी राहीन, असे ववतव्य असे ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)'च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याण येथे केले.

‘मुक्त संवाद अभियान' अंतर्गत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी २८ फेब्रुवारी रोजी ‘कल्याण'चा दौरा केला.  या दौऱ्यावेळी उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अग्रवाल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी कोळसेवाडी शहर शाखा येथे पत्रकार परिषद घेतली.

माझे नाव चर्चेत आहे; पण मला त्याबाबत अधिकृत निरोप नाही, मला फक्त काम करायचे आहे. पक्षाने मला सांगितले  तर मी वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवेन. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणजे फार मोठा अडचणीचा डोंगर असे वाटत नाही. आम्हाला त्यांच्याशी सामोरे जाताना फार मोठा आव्हान असल्याचेही वाटत नाही. निवडणूक लढविण्याबाबत पक्षाने मला अजुन काहीही सांगितलेले नाही, असे सुषमा अंधारे यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारने मनोज जरांगे पाटील प्रकरणी एसआयटी चौकशी लावण्याचे आदेश दिले आहे. सरकारने चौकशी करायला हरकत नाही. मात्र, त्यासोबतच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एसटी आरक्षणाच्या लढ्यात जे ३००-४०० लोक मेले आहेत, त्यांची एसआयटी चौकशी सरकार लावणार आहे का? सरकारला जर एवढी एसआयटी चौकशी लावण्याचे हौस असेल तर ‘भीमा कोरेगाव'च्या एसआयटी चौकशीचे काय झाले? असा सवाल उपस्थित करतानाच यावर सरकारने उत्तर दिले पाहिजे, अशी भूमिका सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलून दाखवली.

पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात. दोघेही सरकार पक्षातले आहेत. आत्तापर्यंत अफरातफरी, गोंगाट आणि गोंधळ झाल्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले. त्याच्या एसआयटी चौकशीचे काय? समृध्दी महामार्गावर भीषण अपघातामध्ये २८ ते ३० प्रवाशांचा बळी गेला आहे. एकाच वेळेला सगळे अपघात होतात, याची एखादे चौकशी सरकारी लावणार आहे का? असेही त्या म्हणाल्या.

एसआयटी चौकशी लावण्याचे जे काही नाटक सरकारकडून सुरु आहे, त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कही पे निगाहे कही पे निशाणा' करु नये. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा निशाणा जर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असेल तर ते थेट सभागृहात बोलावे. आडून-आडून राजेश टोपे, शरद पवार, उध्दव ठाकरे अशी नावे न घेता थेट निशाणा साधावा, थेट बोलावे. जर तुमचे काही आक्षेप असतील तर त्या सर्व घडामोडींमध्ये मंगेश चिवटे सारख्या माणसाचा वावर पण फार महत्त्वाचा होता, अशी बाब सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद मध्ये नमूद केली.

कल्याण वाढती गुन्हेगारी, वाढती ठेकेदारी यामुळे नागरिकांसह पोलीस यंत्रणा सुध्दा दहशतीखाली आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुखाला गोळ्या घालाव्यात, याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत गँगवर किती टिकेला पोहोचला? ते दिसून येते. या परिस्थितीत येणारी निवडणूक डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही जितकी सोपी त्यांना मुख्यमंत्री पुत्र म्हणून वाटत आहे, असा इशाराही उपनेत्या अंधारे यांनी यावेळी लगावला. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सिडकोच्या घरांसाठी अधिवासाची अट रद्द