ठाणे महापालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेस साडेचार लाख नागरिकांनी दिली भेट

ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या वर्षी २८ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेची सांगता २४ फेब्रुवारी रोजी झाली. एकूण ५६ दिवस ठाणे महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी १४८ शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांना सुमारे साडेचार लाख नागरिकांनी भेट दिली.
 
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा पहिला टप्पा २८ नोव्हेंबर २०२३ ते १८ जानेवारी २०२४ पर्यंत राबवण्यात आला. तर दुसरा टप्पा ६ फेब्रुवारी २०२४ ते २४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत राबवण्यात आला. २४ फेब्रुवारी रोजी या यात्रेची सांगता वागळे प्रभाग समिती येथील किसन नगर आणि साठे नगर येथील शिबिरांनी झाली. या शिबिरांना आमदार संजय केळकर, आमदार अॅड. निरंजन डावखरे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे आणि माजी नगरसेवक संजय वाघुले, उपायुक्त शंकर पाटोळे आदी मान्यवरांनी भेट दिली. या सर्व, १४८ शिबिरांत, आरोग्य तपासणीचा लाभ एक लाख ३२ हजार नागरिकांनी घेतला. तर, २४३३४ नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्डासाठी नोंदणी केली. ४०२१ नागरिकांनी आधार कार्डची माहिती अदयावत केली. तर, १७७७ नागरिकांनी गॅस जोडणीच्या केवायसीचे अद्यावतीकरण केले. १०२९ फेरीवाल्यांना पीएम स्वनिधीसाठी नोंदणी केली.
 

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयु्क्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या शिबिरांचे नियोजन केले. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे हे ठाणे महापालिका क्षेत्रातील संपूर्ण मोहिमेचे नोडल अधिकारी होते. तर, विवेक वानखेडे, प्रकाश चव्हाण, धनराज देवीकर यांनी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत ठाणे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम पाहिले. ठाणे महापालिकेमार्फत समन्वयक अधिकारी म्हणून आधार कुलकर्णी यांनी सर्व यंत्रणांशी समन्वय साधून शिबिरांच्या दैनंदिन आयोजनाचे काम पाहिले.  

 या यात्रेच्या माध्यमातून पीएम उज्वला, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड नोंदणी व अपग्रेडेशन, पी एम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, अर्बन ई बस अशा विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांनी घेतली असून त्याबाबतची नोंदणी करण्यात आली आहे. महापालिकेचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अधिकारी आणि कर्मचारी, आरोग्य विभाग यांनी या यात्रेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. महापालिकेच्या संपूर्ण यंत्रणेसोबतच जिल्हाधिकारी कार्यालय, टपाल विभाग, एच पी गॅसची टीम, पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या सहकार्याने विकसित भारत संकल्प यात्रेचे सुनियोजित पद्धतीने आयोजन करणे शक्य झाल्याचे मोहिमेचे महापालिकेचे नोडल अधिकारी उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी सांगितले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आतापर्यत एकूण १४८ ठिकाणी या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेच्या ठिकाणी आरोग्य शिबीर, क्षयरोग तपासणी करुन नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आवश्यक औषधेही उपलब्ध करुन दिली याचाही लाभ नागरिकांनी घेतला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘मनसे'तर्फे लवकरच १०० शाळा-महाविद्यालयांना राज्यगीताची प्रतिमा भेट