राज्यात दहावी पर्यंत मराठी सवतीची करा - राज ठाकरे

नवी मुंबई : प्रत्येक मराठी भाषिक माणसाने समोर येणाऱ्या मग तो कोणत्याही भाषेचा पुरस्कर्ता असो, त्याच्यासोबत मराठी भाषेतूनच संवाद साधला पाहिजे. राज्यातील सर्वच माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली पासून दहावी पर्यंत मराठी भाषा सवतीची करावी, अशी सूचना ‘मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांना केली आहे. वाशी येथे आयोजित ‘विश्व मराठी संमेलन-२०२४'मध्ये राज ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

जर पंतप्रधान आपल्या स्व-राज्याची भाषा, संस्कृती आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना दाखवून त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील असतील तर आपण का मागे पडायचे? असा सवाल उपस्थित करतानाच हिंदी फक्त केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये संवाद साधण्यासाठीची प्रशासकीय मान्यताप्राप्त भाषा असून, ती राष्ट्रीय भाषा नसल्याचे राज ठाकरे यांनी गुजरात हायकोर्टाच्या निकालाचा हवाला देत पुन्हा एकदा अधोरेखित केले.

एकीकडे अमेरिकेत मराठी भाषा शाळा सुरु होत आहेत, तर महाराष्ट्रात मात्र मराठी शाळा बंद पडू नये यासाठी लढा द्यावा लागत आहे. महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे राज्य शासनाने अनिवार्य करा, बाकी त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आम्ही पाहून घेवू, अशी सूचना देखील राज ठाकरे यांनी शासनाला केली.

दरम्यान, यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येत्या शैक्षणिक वर्षात सर्व शाळांसाठी मराठी भाषा शिकवणे अनिवार्य केल्याची माहिती दिली.

मी कडवट मराठी...
आपण कडवट मराठी असल्याचा उल्लेख करत माझ्यावर त्याप्रकारचे संस्कारच झाले आहेत. आजोबांचे पुस्तकरुपात माझ्यावर संस्कार झाले. मराठी विषयावर मी तुरुंगातही जाऊन आलो आहे. आपण सर्वात प्रथम महाराष्ट्रात लक्ष देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील शहरांमध्ये जेव्हा हिंदी माझ्या कानावर पडते, तेव्हा त्रास होतो. माझा इतर भाषांना विरोध नाही. हिंदी काही राष्ट्रभाषा नाही. जशा इतर भाषा आहे, तशीच हिंदी एक भाषा आहे. देशामध्ये राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झाला नसल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबईकरांच्या हक्काच्या आरोग्य व्यवस्थेसाठी अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वात ‘स्वाक्षरी मोहीम'