‘नवी मुंबई महोत्सव'ची जल्लोषात सांगता

नवी मुंबई : श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने सीबीडी येथील सुनील गावस्कर मैदानात १० दिवस रंगलेल्या ‘नवी मुंबई सांस्कृतिक, कला, क्रीडा महोत्सव-२०२४'ची सांगता समारंभ हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झाली. यावेळी भन्नाट अशा लावण्या आणि कोळीगीत नृत्यांच्या कार्यक्रमाने ‘महोत्सव'ची समाप्ती मोठ्या जल्लोषात करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी आणि नागरिकांनी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत नृत्य करुन ‘महोत्सव'चा आनंद लुटला.

सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवी मुंबई सांस्कृतिक, कला, क्रीडा महोत्सव'चे आयोजन करण्यात आले होते. गेली २७ वर्षे समाजपयोगी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य, संगीत आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहेत. ‘नवी मुंबई महोत्सव'मध्ये १० दिवस अनेक दिग्गज मान्यवरांनी भेटी देत तसेच पोलीस बांधवांनी आणि लहान थोरांनी ‘महोत्सव'चा आनंद लुटला. 

विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तुंचे स्टॉल्स तसेच मोठे-मोठे पाळणे ‘महोत्सव'चे आकर्षण होते. हळदी-कुंकू समारंभ, पाककला, मेहंदी आणि पाककला, आम्ही दोघे राजाराणी या सारख्या मनोरंजक कार्यक्रमाचा आनंद सीबीडीवासिय महिलांनी लुटला. तर शेकडो विद्यार्थ्यांनीही चित्रकला स्पर्धेत विविध प्रकारच्या चित्रांच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना स्वच्छतेचा संदेश दिला. ‘महोत्सव'मधील विविध स्पर्धा, उपक्रमांमध्येे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेऊन बक्षिसांची लयलूट केली असून प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महत्वाचे म्हणजे ‘महोत्सव'मध्ये ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय ठरली असून महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांनी संस्कृती जोपासण्याचे काम आपली कला मोठ्या खुबीने सादर केली. या सर्व उपक्रमात महिला-पुरुषांनी ‘महोत्सव'मध्ये सहभाग घेऊन आनंद लुटला, अशी माहिती आयोजिका आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

तसेच सारथी सुरक्षा यांच्या माध्यमातून ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह-२०२४'च्या अनुषंगाने ‘महोत्सव'मध्ये रस्ता सुरक्षेच्या महत्वाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि भारतीय रस्त्यांवरील अपघात आणि मृत्युची संख्या कमी करण्यासाठी उपयायोजनांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.

श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको यांच्या वतीने सांस्कृतिक, कला-क्रीडा क्षेत्रातील होतकरु, तरुण, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी ‘नवी मुंबई सांस्कृतिक, कला, क्रीडा, महोत्सव'चे आयोजन २७ वर्षे केले जात आहे. ‘संस्था'ने राबविलेल्या अशा उपक्रमातून आपल्या सुप्त कला-गुणांना वाव देण्याची संधी अशा कलाकारांना मिळत असते. आतापर्यंत या व्यासपीठावर तयार झालेले अनेक कलाकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करीत आहेत. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

राज्यात दहावी पर्यंत मराठी सवतीची करा - राज ठाकरे