एपीएमसी मार्केट लगतचे अनधिकृत कोल्ड स्टोरेज बंद करण्याची मागणी

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केट लगत अनधिकृत ‘कोल्ड स्टोरेज'चे पेव फुटले असून, येथून विना परवाना शेतमालाची विक्री होत आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केट लगतचे बेकायदा कोल्ड स्टोरेज बंद करण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी एपीएमसी परिसरात मोर्चा काढला होता. एपीएमसी मार्केट लगतचे अनधिकृत कोल्ड स्टोरेज बंद नाही केले तर त्यांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

वाशी मधील एपीएमसी बाजारात राज्य आणि देशाच्या इतर राज्यातील शेतमाल विक्रीसाठी थेट दाखल होतो. त्यानंतर त्या शेतमालाचा मुंबई उपनगरात पुरवठा होतो. मात्र, याच एपीएमसी बाजार लगत काही बाहेरील व्यापाऱ्यांनी कोल्ड स्टोरेज उभारले आहेत. या कोल्ड स्टोरेज मध्ये फळांची साठवण करुन त्या फळांची विक्रीची कोणतीही परवानगी नसताना अनधिकृतपणे विक्री केली जाते. त्यामुळे एपीएमसी मधील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम होतो. पर्यायाने एपीएमसी मधील व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. याबाबत अनेक वेळा सरकारकडे पत्र व्यवहार करुन कडक पावले उचलून अनधिकृत कोल्ड स्टोरेज बंद करावेत, अशी मागणी केली आहे. मात्र, सरकार नवीन कायदा आणून मापाडी, माथाडी यांना संपवू पाहत आहे. त्यामुळे एपीएमसी बाजार लगतच्या अनधिकृत कोल्ड स्टोरेजवर जर तात्काळ कारवाई झाली नाही तर आपण जाऊन अनधिकृत कोल्ड स्टोरेज आणि फळ विक्रेते व्यवसायाला टाळे  ठोकू, असा इशारा माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. आ. शशिकांत शिंदे यांच्या मोर्चात शेकडो माथाडी आणि व्यापारी सामील झाले होते.

कोल्ड स्टोरेज मध्ये फक्त साठवणूक करण्याची परवानगी आहे. मात्र, राज्य शासनाच्या कायद्याचा गैर अर्थ काढत एपीएमसी मार्केट लगत असलेल्या अनधिकृत कोल्ड स्टोरेज चालकांनी आता खरेदी-विक्री व्यवसाय सुरु केला आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केट मधील व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. एपीएमसी मार्केट लगतचे अनधिकृत कोल्ड स्टोरेज बंद करावे, अशी आमची मागणी आहे. मात्र, थातुर-मातुर  कारवाई करुन परिस्थिती ‘जैसे थे' आहे. त्यामुळे शासनाने एपीएमसी मार्केट लगतचे अनधिकृत कोल्ड स्टोरेज तात्काळ बंद केले नाही तर आम्ही त्यांना टाळे ठोकणार आहोत. - आमदार शशिकांत शिंदे. 

 
Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वात भव्यदिव्य महाआरती संपन्न