वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
‘ठाणे'तील गणेशोत्सव आदर्श पध्दतीने साजरा करुया
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सण आणि उत्सवांवर कोणतेही निर्बंध ठेवलेले नाहीत. त्यामुळे ठाणे मधील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात आयोजित करुया. त्याचबरोबर नियमांचे काटेकोर पालन करुन आपण गणेशोत्सव आदर्श पध्दतीने साजरा करुया, असे आवाहन ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पूर्व तयारीबाबत ८ ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समिती, गणेश मंडळे, महापालिका, पोलीस, महावितरण, टोरंट आदिंचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
गणेशोत्सव मंडळांच्या सूचना, त्यांना येत असलेल्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट केले. उच्च न्यायालयाचे निर्देश आणि राज्य सरकारचे निर्देश यानुसार उत्सवांचे नियोजन करण्यात येत आहे. उत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी राज्य सरकार आणि महापालिका आग्रही आहे, असेही रोडे यांनी सांगितले.
ऑनलाईन परवानगीला सुरुवात...
मंडप उभारणीच्या परवानगीसाठी महापालिकेने ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्याची लिंक महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. गतवर्षी सुमारे २५० मंडळांनी परवानगी घेतली होती. ऑफलाईन परवानगीची व्यवस्था प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात करण्यात आलेली आहे. मात्र, त्यात वेळ जात असल्याने मंडळांनी ऑनलाईन परवानगी घ्यावी, असे आवाहन उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी केले. त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मंडपाबाबत देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.
मंडप परवानगीसाठी हेल्पलाईन...
मंडपाच्या ऑनलाईन परवानगीसाठी कोणतीही समस्या येत असल्यास पदाधिकाऱ्यांनी ८०९७१९२८६८ या मोबाईल हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. तेथे त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल, अशी माहिती गोदेपुरे यांनी दिली. तसेच ‘महावितरण'कडून तात्पुरत्या वीज जोडणीबाबत काही समस्या असल्यास ‘महावितरण'च्या वागळे इस्टेट कार्यालयातील ग्राहक सुविधा केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन ‘महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी केले.
एकल वापराचे प्लास्टिक नकोच...
गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक उत्सवासाठी प्रयत्नशील रहावे. शक्यतो शाडुच्या मातीची मूर्ती आणावी. तसेच प्रसादासाठी प्लास्टिकचे चमचे, प्लास्टिकचे द्रोण-पिशव्या अशा एकल वापराच्या (सिंगल यूज) प्लास्टिकचा वापर करु नये. त्यासाठी दंड होऊ शकतो, अशी माहिती महापालिकेच्या प्रमुख पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.
त्याचसोबत वीज जोडणी आणि अग्निसुरक्षा यांच्याबाबत उपनगर अभियंता (विद्युत) शुभांगी केसवानी, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरिश झळके यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. पोलीस विभाग आणि महावितरण, टोरंटच्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्या गणेशोत्सव मंडळांकडून असलेल्या अपेक्षा विशद केल्या.
आरास स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन...
ठाणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी दरवर्षी महापालिका आरास स्पर्धेचे आयोजन करते. त्यात एकूण आठ पारितोषिके दिली जातात. प्रथम क्रमांकास १० हजार, द्वितिय क्रमांकास ७५०० आणि तृतीय क्रमांकास ६५०० रुपये असे पारितोषिक असते. सर्व मंडळानी या स्पर्धेत सहभागी व्हावे. ०२ सप्टेंबरपर्यंत मंडळांना माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयात अर्ज सादर करता येतील. या स्पर्धेचे परिक्षण त्रयस्थ परिक्षकांमार्फत केले जाते, अशी माहिती उपायुक्त (माहिती व जनसंपर्क विभाग) उमेश बिरारी यांनी दिली.
सदर बैठकीत, माजी महापौर अशोक वैती, ‘ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समिती'चे अध्यक्ष समीर सावंत, विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांनी वीज जोडणी, विजेच्या उच्च दाब तारा, कोलशेत आणि पारसिक येथील मोठ्या मूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था, आगमन आणि विसर्जन मार्गातील वृक्षांच्या फांद्यांची छाटणी, मंडपांच्या परिसरातील स्वच्छता यांच्या विषयी सूचना तसेच समस्या मांडल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्या समस्या दूर कराव्यात, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले. घाटांवरील विर्सजन व्यवस्थेबाबत गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचा ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'ने निर्णय घ्यावा, असेही माळवी यांनी सांगितले.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव संकल्पना राबविणारे ठाणे राज्यातील पहिले शहर आहे. या संकल्पनेला गणेशभक्त, गणेश मंडळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याच सकारात्मक वातावरणात याही वर्षीचा गणेशोत्सव साजरा करुया. सर्वानुमते जी नियमावली ठरली आहे, तिचे सगळ्यांनी काटेकोर पालन केले तर नागरिकांची, गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही. वाहतुकीला, पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होणार नाही. त्यादृष्टीने सर्व मंडळांनी सहकार्य करावे.
-संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त-ठाणे महापालिका.