नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करा
नवी मुंबई : पर्यावरणाचे संरक्षण करणे सर्वांचे प्रथम कर्तव्य असून यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असा प्लास्टिकमुक्त साजरा करावा, अशी प्रतिज्ञा करण्याचे आवाहन करीत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींचा वापर टाळून शाडुच्या मूर्तींची स्थापना करावी. तसेच मूर्तींची उंचीही मर्यादित राखावी आणि विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करुन नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण करावे, असे आवाहन केले.
यावर्षी ७ सप्टेंबर पासून सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत असून या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका, पोलीस आणि संबंधित प्राधिकरणे यांची श्रीगणेशोत्सव मंडळांसमवेत पूर्वतयारी नियोजन बैठक महापालिका मुख्यालय येथे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, परिमंडळ-१चे उपायुक्त सोमनाथ पोटरे, परिमंडळ-२चे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड आणि इतर विभागप्रमुख तसेच पोलीस अधिकारी, विभाग अधिकारी आणि इतर प्राधिकरणांचे अधिकारी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना उत्सव सुनियोजित पध्दतीने साजरा व्हावा, याकरिता सूचना करण्याचे सूचित केले. त्यानुसार गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आनि त्यानंतर पोलीस, महापालिकेचे अधिकारी यांच्याकडूनही त्यांची मते आणि सूचना जाणून घेण्यात आल्या. ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या अधिकारी यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पाळावयाच्या नियमांची माहिती दिली.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तात्पुरत्या स्वरुपात मंडप आणि तत्सम रचना उभारण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही मंडप उभारणे परवानगी देण्यासाठी ‘नमुंमपा'ने विकसित केलेल्या ‘ई-सेवा संगणक प्रणाली' उपयोगात आणण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रणालीद्वारे एकाच ठिकाणी सर्व विभागांकडून परवानगीसाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे सादर केल्यानंतर परवानगी प्राप्त होत असल्याने ‘एक खिडकी योजना'ची ऑनलाईन प्रणाली उपयोगी असल्याचे मत अनेक गणेशोत्सव मंडळांनी व्यक्त केले. याविषयाच्या अनुषंगाने उत्सवाच्या १० दिवस आधी मंडळांनी ऑनलाईन परवानगी प्राप्त करुन घ्यावी, असे महापालिकेमार्फत सूचित करण्यात आले. तसेच या परवानगीसाठी महापालिका मार्फत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे आयुक्त डॉ. शिंदे यांनी जाहीर केले. या निर्णयाचे सर्व गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले.
मंडप परवानगीसाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे इतर प्राधिकरणांकडून उपलब्ध करुन घेताना ‘सिडको'मार्फत जागेची परवानगी मिळण्यात तसेच एमएसईडीसीएल यांच्याकडून वीजपुरवठा मीटर उपलब्ध करुन देण्यात आणि गणेशोत्सवानंतर अनामत रक्कम परत देण्यात होणारा विलंब टाळावा, अशी सूचना गणेशोत्सव मंडळांमार्फत करण्यात आली. त्यानुसार संबंधित प्राधिकरणांना सूचना करण्यात येतील, असे आयुक्तांनी सांगितले.
गणेशोत्सवापूर्वी ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत, त्यांची तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले. त्यावर शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व विभागांच्या कार्यकारी अभियंता यांना दिले. तसेच एनएमएमटी बसगाड्या रस्त्यात बंद पडल्या तर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष फिरते पथक नेमण्याचेही निर्देश देण्यात आले.
गणेशोत्सव कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने अनेक नागरिक मोठ्या संख्येने कोकणात जात असतात. त्यांच्या बसेस उभ्या राहतात, अशा स्थानकांच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तसेच मोबाईल टॉयलेट आणि विद्युत व्यवस्था ठेवण्यात यावी. रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्यामुळे आगमन-विसर्जन मिरवणुकीला अथवा वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन अशा झाडांच्या फांद्यांची योग्य प्रमाणात छाटणी करुन घ्यावी. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विसर्जनस्थळी पुरविण्यात येणाऱ्या सर्व सुविधा पूर्वापार पध्दतीने पुरवाव्यात. यामध्ये आवश्यक वाढ आत्ताच करुन घ्यावी, असे निर्देश आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी दिले.
नैसर्गिक जलसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी महापालिका मोठ्या प्रमाणात निर्माण करीत असलेल्या कृत्रिम तलावातच आपली गणेशमूर्ती विसर्जित करावी. नागरिकांना त्यांच्या घराजवळील विसर्जन स्थळांची माहिती उपलब्ध होण्यासाठी जिओ टॅग असलेली कृत्रिम आणि नैसर्गिक विसर्जन स्थळांची यादी विविध माध्यमांतून प्रसिध्द करण्यात येईल. त्याचप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी निश्चय करुन शाडुच्या गणेशमूर्तीच आणाव्यात. याशिवाय मूर्तींची उंची मर्यादित ठेवण्यासाठी आपणहून स्वयंस्फुर्तीने पुढाकार घ्यावा, नवी मुंबई महापालिका आपले स्वागत करेल. महत्वाचे म्हणजे पर्यावरणाला सर्वात मोठा धोका प्लास्टिक आणि थर्माकोलचा असून सजावटीत तसेच कोणत्याही गोष्टीत प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळून पर्यावरणशील ‘प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव' साजरा करण्याची प्रतिज्ञा करुया.
-डॉ.कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका.