शिवसेना ठाकरे गटाचा उरण तहसील कार्यालयावर मोर्चा

उरण : ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'च्या वतीने उरण तालुक्यात सातत्याने उद्‌भवणाऱ्या वाहतूक कोंडी,  खड्डेमय रस्ते, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, वाढते अपघात, सलाईनवरील आरोग्य यंत्रणा, महसूल आणि बीडीओ कार्यालयातील अनागोंदी कारभार यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली ८ ऑगस्ट रोजी उरण तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

उरण तालुक्यातील जनतेला अनेक समस्यांनी वेढले आहे. सदर समस्यांचे निराकरण करण्यासाठी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घ्ोऊन आपल्या मागणीतून उरण तालुक्यात सातत्याने उद्‌भवणारी वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, वाढते अपघात, अनधिकृत पार्किंग, अंमली पदार्थांची वाढती विक्री, विजेची समस्या, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, सलाईनवरील आरोग्य यंत्रणा, महसूल आणि बीडीओ कार्यालयातील अनागोंदी कारभार यावर ठोस उपाययोजना करावी. तसेच शेती आणि मासेमारी करणाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली होती.

परंतु, संबंधित प्रशासनाने सदर जनहिताच्या प्रश्नांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने ‘शिवसेना ठाकरे गट'च्या वतीने ८ आँगस्ट रोजी उरण शहर (शिवसेना शाखा) ते उरण तहसील कार्यालय पर्यंत धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मनोहर भोईर यांनी ‘उरण'चे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांच्यासमोर उरणकरांच्या समस्यांचा पाढा वाचत उरणची आमसभा ५ वर्षे का झाली नाही? असा सवालही केला. तसेच शासनाच्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि अभियंता यांना निलंबित करण्याची मागणी करतानाच उरण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याची तसेच महिलांसाठी शौचालय निर्माण करण्याची, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली. अन्यथा चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशाराही भोईर यांनी तहसीलदार कदम यांना निवेदनातून दिला आहे.

याप्रसंगी गटविकास अधिकारी समीर वाठारकर, उप गटविकास अधिकारी डॉ. संतोष डाबेराव, पोलीस अधिकारी सुर्यकांत कांबळे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल दहीफळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एम. काळेल, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, माजी सभापती विश्वास म्हात्रे, ‘महिला आघाडी'च्या भावना म्हात्रे, ज्योती सुरेश म्हात्रे, मनिषा ठाकूर, रंजना तांडेल, तालुका संघटक बी. एन. डाकी, दिपक भोईर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, शिवसेना तालुका उपसंघटक रुपेश पाटील, ‘विद्यार्थी सेना'चे जिल्हा संघटक रोहिदास पाटील, कोप्रोलीचे माजी उपसरपंच नीरज पाटील, शाखाप्रमुख रवी म्हात्रे, आकाश म्हात्रे, अशोक घरत, श्याम मोकाशी, नंदन म्हात्रे, महेश कोळी, संतोष कोळी, लक्ष्मण ठाकूर, राजेश भोईर, अमिताभ भगत, मंगेश थळी,नारायण तांडेल, नितेश पाटील, नयनेश भोईर, लवेश म्हात्रे, आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

दरम्यान, उरणच्या जनतेच्या निगडीत समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील. त्याकरिता तलाठ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पाऊस कमी झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. नुकसानग्रस्तांना लवकरच लवकर भरपाई देण्यात येणार आहे, असे आश्वासन तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 नागपंचमी निमित्त सापांबद्दलच्या अंधश्रद्धा विषयावरील संवादसत्रातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन