६ मूर्तीकारांना निःशुल्क शाडू माती, ४ मूर्तीकारांना निःशुल्क जागा

ठाणे : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आयोजन व्हावे यासाठी ठाणे महापालिका तर्फे मार्च महिन्यापासून विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याच अंतर्गत महापालिकेने यंदा ठाणे महापालिका क्षेत्रातील ६ मूर्तीकारांना निःशुल्क शाडुची माती तसेच ४ मूर्तीकारांना मूर्ती घडविण्यासाठी निःशुल्क जागा उपलब्ध करुन दिली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी महापालिका पर्यावरण विभागाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तीकार संघटना, स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. या सगळ्यांच्या सहकार्याने सदर उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याकडे आपण मार्गक्रमण करु शकतो, अशी भूमिका आयुक्त राव यांनी मांडली आहे. त्यानुसार केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या सूचनांनुसार ठाणे महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली-२०२४ मार्च महिन्यात प्रकाशित केली. तसेच विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या स्तरावर बैठकांचेही आयोजन करण्यात आले होते.

याच उपक्रमात महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शाडुची निःशुल्क माती तसेच मूर्ती घडविण्यासाठी निःशुल्क जागा उपलब्ध करून दिली होती. शाडुच्या निःशुल्क मातीसाठीच्या आवाहनाला ६ मूर्तीकारांनी मागणी नोंदवून प्रतिसाद दिला. तर शाडुच्या मातीच्या मूर्ती घडविण्यासाठी ४ मूर्तीकारांनी निःशुल्क जागेची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेने वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात ३ आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात १ जागा दिली. इतर प्रभाग समिती क्षेत्रातून तशी मागणी झाली नाही, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.

दरम्यान, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिकेने प्रथमच मूर्तीकार संघासोबत विष्णुनगरमधील महापालिकेच्या शाळा क्र.१९ येथे पर्यावरण स्नेही मूर्ती, मखर आदि साहित्यांचे प्रदर्शन भरविले. तेथे पुठ्ठा, कागद, कोकोपीठ, शाडू, लालमाती यांच्यापासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती, कागदाचे मखर इत्यादी साहित्य ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनासोबतच नागरिकांसाठी शाडू मातीपासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या समन्वयाने करण्यात आली. ठाणेकरांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला. या प्रदर्शन साहित्याविषयीची अधिक माहिती आणि संपर्क महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे मनिषा प्रधान यांनी सांगितले.

त्याचबरोबर पर्यावरणपूरक उत्सवांच्या आयोजनात लहान मुलांचा सहभाग वाढविण्यासाठी शाडू मातीपासून मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळांचे शाळांमध्येही आयोजन केले. पहिल्या टप्प्यात परब वाडी, कळवा, किसननगर, बाळकूम, दिवा, वर्तकनगर, शीळ, मानपाडा, येऊर आणि टेंभीपाडा येथील महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातानी मूर्ती घडवलीच. शिवाय पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्याची प्रतिज्ञाही केली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 आप महाराष्ट्रातील २८८ जागा लढविणार