वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
बीएमटीसी कामगार उपोषणावर ठाम
नवीन पनवेल : बीएमटीसी कामगारांच्या ४० वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने बीएमटीसी कामगारांनी ९ ऑगस्ट रोजी सिडको गेट समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिलेला आहे.
‘सिडको'कडून बीएमटीसी कामगारांच्या सार्थ मागणीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यास दिरंगाई होत असल्याने बीएमटीसी कामगार तसेच त्यांच्या कुटुंबियांनी कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली उद्या ९ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.
‘सिडको'ची तत्कालीन बीएमटीसी परिवहन सेवा काही अधिकारी, कर्मचारी आणि तत्कालीन राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे देशोधडीला लागली. त्यानंतर ४० वर्षापासून या कामगारांचा न्यायासाठी लढा सुरुच आहे. बीएमटीसी कामगारांना ‘सिडको'कडून १० बाय १० चौरस फुटाचे एकत्रित भूखंड तसेच थकीत नुकसानभरपाई मिळेल, असा निर्णय १० जुलै २०१३ रोजी झाला होता. तत्कालीन राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे ९ फेब्रुवारी १९८४ मध्ये बीएमटीसी बससेवा बंद पडल्याने १८०० कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली.
दिवंगत कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना किंवा त्यांच्या वारसांना नवी मुंबईत १० बाय १० चौरस फुटाचे एकत्रित भूखंड देण्याचा ऐतिहासिक ठराव संचालक मंडळाने १० जुलै २०१३ रोजी घेतला. शाम म्हात्रे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या श्रुती शाम म्हात्रे यांनी या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री तथा तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वेळोवळी बैठका करुन सदरचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘सिडको'कडून सर्व कामगारांना गाळे देणाचा प्रस्ताव देखील फेटाळला गेला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळ्याची उपलब्धता होऊ शकणार नाही या कारणाने एकत्रित भूखंड देण्याच्या प्रस्तावावर सिडको महामंडळ आणि महाराष्ट्र शासन तसेच बीएमटीसी कामगारांचे शिष्टमंडळ यांच्यामध्ये गेल्या अडीच वर्षापासून चर्चा सुरू आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळोवेळी बीएमटीसी कामगारांचे शिष्टमंडळ त्यांच्या मागणीबाबत अवगत करत असून देखील आजपर्यंत ‘सिडको'कडून बीएमटीसी कामगारांच्या सार्थ मागणीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे बीएमटीसी कामगार तसेच त्यांच्या कुटुंबियांनी ९ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, असे श्रुती म्हात्रे यांनी सांगितले.