वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
ब्लास्टींग विरोधात ग्रामस्थ आक्रमक
नवीन पनवेल : नवी मुंबई विमानतळाजवळ सुरु असलेल्या ब्लास्टींग विरोधात ओवळे, कुंडेवहाळ ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ६ ऑगस्ट रोजी येथील ग्रामस्थांनी विमानतळ प्रकल्पावरील ब्लास्टींगचे काम बंद पाडून ‘सिडको'ला जाब विचारला. यावेळी ‘२७ गाव प्रकल्पबाधित संघटना'चे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, ‘ओवळेे'चे सरपंच रुपेश गायकवाड, उपसरपंच निलेश गायकवाड, 'कुंडेवहाळ'चे सरपंच सदाशिव वासकर, विक्रांत घरत यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
पनवेल तालुक्यातील ओवळे गांव जवळ नवी मुंबई विमानतळाचे काम सुरु आहे. या कामासाठी सदर भागात असलेले डोंगर फोडण्यासाठी ब्लास्टींगचा वापर करण्यात येत आहे. डोंगर फोडताना ज्या तीव्रतेने ब्लास्टींग करणे आवश्यक असते, त्याहून जास्त तीव्रतेने ब्लास्टींग करण्यात येत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच ब्लास्टींग करताना केमिकल आणि ब्लास्टींग झाल्यानंतर जो वास येतो, त्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 1५0 होल पाडून ब्लस्टिंगचे नियोजन सिडकोने केले होते याची माहिती ओवळे आणि कुंडेवहाळ ग्रामस्थांना समजली. यापूर्वीच ब्लास्टिंगमुळे गावातील काही घरांना तडे गेल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, तरीही येथे अधिक तीव्रतेने ब्लास्टींग होणार असल्याचे ओवळे, कुंडेवहाळ गावातील ग्रामस्थांना समजले.
त्यानुसार त्यांनी या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी होत असलेल्या ब्लास्टींग विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी सिडको अधिकारी यांनी आंदोलन स्थळी येऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. त्यांनी ब्लास्टींग बंद करण्याची मागणी केली. ब्लास्टींगमुळे दगड घरावर उडाल्यास होणाऱ्या जीवितहानीस जबाबदार कोण? असा सवाल यावेळी विचारण्यात आला. त्यामुळे येथील ब्लास्टींगचे काम तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.