वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
डोंबिवलीतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी
डोंबिवली : मुंबईतील घाटकोपर येथे मोठे होर्डिंग पडल्याची घटना ताजी असतानाच इतर शहरांप्रमाणे कल्याण-डोंबिवली महापालिकेने हद्दीतील मोठे होर्डिंग काढणे आवश्यक होते. मात्र, कल्याण येथील होर्डिंगवरील पत्रे पडल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले. यावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष अनधिकृत होर्डिंगबाबत महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांना निवेदन देणार आहे. तसेच नागरिकांच्या जीवाचा विचार करुन डोंबिवलीतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.
काही महिन्यांपूर्वी घाटकोपर येथे मोठे होर्डिंग पडल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर काहीजण जखमी झाले होते. नुकतीच कल्याणमध्येही होर्डिंग पडल्याची घटना घडली आहे. कल्याण-डोंबिवली शहरात लावलेले अनधिकृत होर्डिंग आणि अनधिकृतरित्या पास केलेले होर्डिंग्स जे कोणी लावतात, त्याबाबत शिवसेना पक्षाकडून महापालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांना निवेदन देणार आहे. असे होर्डिंग जनतेच्या जीवावर बेतू नयेत. इमारतीजवळ, घराजवळ मोठे होर्डिंग्स लावू नये. डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात स्टेशनजवळ मोठे होर्डिंग अद्याप असून जर सदर होर्डिंग्स पडले तर अनेकजण जखमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही पक्षाच्या शहरप्रमुखांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाला पत्र देऊन जागेचा सर्व्हे करुनच नागरिकांच्या जीवितास हानी होणार नाही अशा ठिकाणी होर्डिंग्स लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणार असल्यादे शिवसेना डोंबिवली पश्चिम उपशहरप्रमुख सुरज पवार यांनी सांगितले.
डोंबिवली पूर्व-पश्चिम स्टेशन बाहेर मोठे होर्डिंग धोकादायक?
मोठे होर्डिंग पडल्याची घटना घडूनही अद्याप ‘केडीएमसी'ने हद्दीतील मोठे होर्डिंग काढलेले नाहीत. डोंबिवली पूर्व आण पश्चिम स्टेशन बाहेर असलेल्या मोठ्या होर्डिंगची नागरिकांना भिती वाटत असून ते होर्डिंग काढण्याची मागणी जोर धरु लागली आहे. स्टेशनमधून बाहेर पडताना आणि जाताना प्रवाशांना मोठ्या होर्डिंग खालून जावे लागते. भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये याकरिता डोंबिवली पूर्व आणि पश्चिम स्टेशन बाहेरचे मोठे होर्डिंग काढण्याची मागणी होत आहे.
डोंबिवली जिमखाना जवळील मोठे होर्डिंग काढण्याची मागणी...
डोंबिवली पूर्वे कडील शिवम हॉस्पिटल समोरील डोंबिवली जिमखानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला काही महिन्यांपूर्वी मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. सदरचे होर्डिंग पडून नागरिक जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच होर्डिंगखाली आणखी एक होर्डिंग काही दिवसांपूर्वी लागण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने वेळीच या ठिकाणावरील मोठे होर्डिंग काढावे, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.