वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
बदलापूर मध्ये केमिकल कंपनीत स्फोट
बदलापूरः डोंबिवली पाठोपाठ आता बदलापूर देखील एमआयडीसी मधील कंपनीतील स्फोटामुळे हादरुन गेले आहे. बदलापूर येथील माणकिवली एमआयडी मधील रेअर फार्मा या रासायनिक कंपनीत ५ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मोठा स्फोट होऊन कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. या स्फोटाची भयानकाताही मोठी होती. दुर्घटनेवेळी कंपनीतील रिॲॅक्टरचा रिसीव्हर उडून तब्बल ४०० मीटर लांब असलेल्या चाळीवर जाऊन पडला. यामुळे तेथील एका व्यक्तीला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले. त्याचवेळी त्यांची पत्नी आणि मुलगीही जखमी झाली. दरम्यान, सदरचा स्फोट कशामुळे झाला? याची माहिती पोलीस आणि अग्निशमन अधिकारी घेत आहेत. तर या स्फोटाच्या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बदलापूर येथील माणकिवली एमआयडीसी विभागात असलेल्या रेअर फार्मा कंपनीमध्ये केमिकल्स उत्पादन केले जाते. ५ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास कंपनीत रिॲॅक्टरमध्ये प्रक्रिया सुरु होती. याचवेळी अचानक रिसीव्हरमध्ये मोठा स्फोट झाला. यानंतर तिथेच असलेल्या मिथेनॉल या ज्वलनशील पदार्थांच्या ड्रम्सने देखील पेट घेतला. आणि बघता बघता कंपनीत भीषण आग लागली. काहीच वेळात आग वाढत गेली आणि रेअर फार्मा कंपनी आगीत भस्मसात झाली. सदरचा स्फोट इतका भीषण होता की, रिॲक्टर सोबत असलेला रिसीव्हर उडून माणकिवली गावातील एका चाळीवर जाऊन कोसळला.
यावेळी सदर चाळीमधील एक कुटुंब गाढ झोपेत असताना त्यांच्या घरावर धातूचा तुकडा पडला आणि छतावरुन तो थेट घरात आला. यावेळी घरात झोपलेल्या एका व्यक्तीच्या पायावर पडल्याने त्याला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले. तर पाय गमावलेल्या व्यक्तीच्या पत्नी आणि मुलीच्या पायालाही दुखापत झाली आहे. या तिघांपैकी दोघांवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर सदर व्यक्तीला पुढील उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले, अशी माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदा शितोळे-शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान, सदर स्फोटामध्ये कंपनी जळून खाक झाली आहे. कंपनीतील कुणीही जखमी झाले नसले तरीही जवळच्या रहिवाशी चाळीमधील एका कुटुंबातील तिघे जण जखमी झाले आहे. या दुर्घटनेबाबत पोलीस आणि अग्निशमन दलाकडून अधिक तपास सुरु आहे.