वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
12 किमी फरफटत नेणार्या डम्पर चालकाला पनवेल शहर पोलिसांनी केले जेरबंद
नवी मुंबई : पनवेल भागातील एका डंपर चालकाने डंपर थांबवण्यासाठी डंपरच्या बोनेटवर चढलेल्या ट्रेलर चालकाला 12 किमी फरफटत नेऊन त्याला खाली पाडून पलायन केले होते. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी डंपर चालकाचा तांत्रिक तपास व सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातुन शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेत बोनेट वरून पडल्यामुळे ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ट्रेलर चालकाचे नाव प्रवीण येळे (२६) असे असून तो गत २२ जुलै रोजी कळंबोली येथे असताना आरोपी डंम्पर चालक राकेश चौधरी (२६) याने प्रवीण येळे याच्या ट्रेलरच्या केबिनला घासुन पळ काढला होता. त्यावेळी प्रवीण येळे याने राकेश चौधरी याला थांबवण्याचां प्रयत्न केला, मात्र तो न थांबल्याने प्रवीण येळे याने त्याचा पाठलाग करून पनवेलजवळील जेडब्ल्यूआर कंपनीजवळ राकेश चौधरी याचा डंपर थांबवला. त्यानंतर प्रवीण येळे याला खाली उतरण्यासाठी तो डंम्परच्या बोनेटवर चढला. मात्र यावेळी राकेश चौधरी याने त्याचा डंम्पर न थांबविता, सदर डंपर जेएनपीटीच्या विरुद्ध दिशेने तसाच पळवून नेला.
यावेळी प्रवीण येळे हा डंम्परच्या बोनेटवर धोकादायक परिस्थितीत लटकत असताना देखील राकेश चौधरी याने त्याला 12 किलोमीटर फरफटत नेले. त्यानंतर त्याने कुंडेवहाळ परिसरामध्ये असलेल्या खदानीकडे जाणार्या कच्च्या रस्त्यावरुन प्रवीण येळे याला चालत्या बोनेटवरुन खाली पाडून पलायन केले होते. या घटनेत प्रवीण येळे हा गंभीर जखमी झाला होता. या बाबतचा गुन्हा पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उद्धव साळुंखे यांनी तपासा दरम्यान सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली असता, अज्ञात डंपर चालकाने हा प्रकार करून पलायन केल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांना सदर डंपर गोवंडी येथे सापडला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपी डंपर चालक राकेश चौधरी याला नवी मुंबई परिसरातून ताब्यात घेतले आहे.