शाळा-कॉलेजसमोरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोपरखैरणे वाहतूक पोलिसांचा पुढाकार  

नवी मुंबई : शाळा-कॉलेज भरताना व सुटताना रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोपरखैरणे वाहतूक शाखेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कोपरखैरणे वाहतूक शाखेने आंतरराष्ट्रीय ट्रफिक लाईट दिवसाचे औचित्य साधुन कोपरखैरणे व घणसोली विभागातील सर्व शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकासह पदाधिकाऱयांची बैठक घेऊन त्यानां शाळा-महाविद्यालयासामोर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या आहेत.  

कोपरखैरणे व घणसोली भागातील सर्वच शाळेत विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूलबस, स्कूल व्हॅनची सुविधा आहे. काही पालक मुलांना स्वत: शाळेत घेऊन येतात आणि स्वत: घरी घेऊन जातात. त्यासाठी दुचाकीसह चारचाकी मोटारींचा वापर केला जातो. मात्र, शाळेसमोर वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने पालक वा स्कूलबस-व्हॅन चालक जागा मिळेल, तिथे वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अनेकांचा खोळंबा होता.    

दरदिवशी सकाळी शाळा कॉलेज भरताना व दुपारी सुटताना त्या शाळेसमोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन त्याचा इतर वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असल्याने यावर उपाययोजना करण्यासाठी कोपरखैरणे वाहतूक शाखेने आंतरराष्ट्रीय ट्रफिक लाईट दिवसाचे औचित्य साधुन सोमवारी कोपरखैरणेतील सेंट मेरी शाळेतील सभागृहात कोपरखैरणे व घणसोलीतील सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व पदाधिकाऱयांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला 38 शाळा कॉलेजचे मुख्यध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते.  

यावेळी कोपरखैरणे वाहतुक शाखेचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी शाळेसमोर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालकांची तसेच स्कुल व्हॅन, स्कुल बस चालकांची मिटिंग घेण्याबाबत सुचित केले. तसेच जवळ जवळ असलेल्या शाळांची भरण्याची व सुटण्याची वेळ सारखी असलेल्या शाळांनी आपल्या वेळेत थोडाफार बदल करण्याचे देखील सुचित केले. यावेळी वाहतूक शाखेकडुन प्रत्येक शाळेसमोर शाळा सुटताना व भरताना वाहतूक पोलीस तैनात करण्याचे आश्वासन देण्यात आले.    
यावेळी शाळांना येणाऱया अडचणी देखील वाहतूक पोलिसांनी जाणून घेतल्या. तसेच सर्वांनी वाहतूकीचे नियम कसे पाळावेत याबाबत प्रबोधन करण्यात आले. त्याचप्रमाणे वाहनावर असलेल्या दंडाची रक्कम कोपरखैरणे वाहतूक शाखेत भरुन घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले.    

सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे (प्रभारी-कोपरखैरणे वाहतूक शाखा)  

कोपरखैरणे व घणसोलीतील शाळा सुटताना व भरताना त्या शाळेसमोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन त्याचा इतर वाहन चालकांना त्रास होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी कोपरखैरणे व घणसोलीतील सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात येऊन त्यांना उपायोजना करण्याबाबत सुचना व मार्गदर्शन करण्यात आल्या आहेत.   

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नमुंमपा'मध्ये बायोमेट्रिक हजेरीचे तीन-तेरा!