खा. नरेश म्हस्के यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा

नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्याची मागणी  

ठाणे : खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची रेल भवन येथील कार्यालयात भेट घेत ठाणे लोकसभा मतदार संघामधील रेल्वे प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधील विविध प्रश्न, मुलभूत सुविधा आणि नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडणे याबाबत खासदार म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे लक्ष वेधले.

कोकण रेल्वे मार्गावर प्रामुख्याने ठाणे ते रत्नागिरी, सावंतवाडी, गोवा, मंगळूर आणि केरळ दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या अडचणी खासदार नरेश म्हस्के यांनी ना. अश्विनी वैष्णव यांच्या समोर मांडल्या. एलटीटी कुर्ला-मडगाव-मंगलोर रेल्वे मार्गावरील बहुतांश गाड्यांमध्ये जास्त गर्दी असल्याने आरक्षण उपलब्ध होत नाही. मुंबई महानगर असल्याने या मार्गावर अधिकाधिक गाड्या चालविण्याची गरज असून त्यानुसार सीएसएमटी आणि एलटीटी कुर्ला तसेच ठाणे ते नाशिक, पुणे, मिरज येथेही पुरेशा टर्मिनल सुविधा नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ठाणे-मडगांव रोजच्या २ गाड्या, ठाणे-सावंतवाडी २, ठाणे-मंगलोर १, ठाणे-कोची/त्रिवेंद्रम २, ठाणे-नाशिक २, ठाणे-मिरज १ आणि ठाणे-पुणे दररोज २ गाड्या सोडाव्यात. तसेच ठाणे-बोरिवली मार्गावर ईएमयू गाडी सुरु करावी, अशी मागणी खासदार म्हस्के यांनी यावेळी केली.

ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर रेल्वे स्थानकांमधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. येथून रेल्वे प्रशासनाला चांगला महसूल मिळतो. अशा रेल्वे स्थानकांचे ‘रेल्वे'ने वेळोवेळी सर्वेक्षण केले पाहिजे. जेणेकरुन त्या स्थानकांवर मुलभूत सुविधांची कमतरता कळू शकेल. भविष्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन केलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करुन त्या दिशेने पावले उचलावीत, अशी विनंती देखील खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री वैष्णव यांना केली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 वाशी गांव भुयारी मार्गाची दुरावस्था