वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
उरण परिसरातील पहिलाच गॅस शवदाहिनी प्रकल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
उरण : उरण परिसरातील पहिलाच वायुवरील शवदाहिनी प्रकल्प उरण नगरपरिषद तर्फे उरण शहरातील बोरी येथे उभारण्यात आला आहे. सुमारे १ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या शवदाहिनी प्रकल्पामुळे नागरिकांच्या वेळ, पैशाचीही मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. मात्र, पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदुषणाला पर्याय ठरणारा वायुवरील शवदाहिनी प्रकल्प अद्यापही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
उरण शहरवासीयांसाठी पर्यावरण पूरक वायुवर चालणारी शवदाहिनी बोरी स्मशानभूमीत उभारण्यात आली आहे. सुमारे एक कोटी रुपये खर्च करून उभारलेला वायुवर आधारित शवदाहिनी प्रकल्प लाकडांवर मृतदेह जळीत करण्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रदुषणाला पर्याय ठरणार आहे. याशिवाय नाममात्र दर आकारणीमुळे नागरिकांच्या वेळ, पैशाचीही मोठ्या प्रमाणावर बचत होणार असून, सदर प्रकल्प उरण परिसरातील पहिलाच वायुवर आधारित शवदाहिनी प्रकल्प आहे.
उरण शहरातील लोकसंख्या ३५ हजारांपेक्षा अधिक आहे.त्यातच उरण परिसरातील वाढत्या औद्योगिक पसाऱ्यामुळे लोकसंख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे वाढत्या वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघातातील आणि बेवारस मृतदेहाच्या दहनाचा ताणही उरण नगरपरिषद प्रशासनाला सोसावा लागत आहे. उरण शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत उरण शहरात बोरी, भवरा, मोरा या तीन ठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था आहे. दररोज रात्री- अपरात्री मृतदेहांचे दहन करण्यासाठी स्मशानभूमीत येणाऱ्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना लाकूडफाटा उपलब्ध करुन देण्याचे काम ‘उरण नगरपरिषद'ला करावे लागते.
सध्याच्या प्रचलित पध्दतीनुसार अंत्यविधीसाठी कमीत कमी ५०० ते ७५० किलो लाकूडफाटा लागतो. यासाठी साधारणपणे पाच हजारांपेक्षा अधिक खर्च करावा लागतो. याशिवाय मृतदेहाची राख होईपर्यंत नातेवाईकांसह आलेल्या आप्तेष्टांना नाहक तीन-चार तास अंत्यसंस्कारासाठी ताटकळत स्मशानभूमीतच बसावे लागते. यामुळे मृतांच्या नातेवाईकांना नाहक खर्चाच्या तसेच नाहक वाया जाणाऱ्या वेळेच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने मनस्तापही सहन करावा लागतो.
उरण नगरपरिषद तर्फे उभारण्यात आलेल्या वायुवर आधारित शवदाहिनी प्रकल्पामुळे नागरिकांचा त्रास कमी होणार आहे. उरण शहरातील बोरी स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी उभारण्यात आली आहे. - समीर जाधव, मुख्याधिकारी - उरण नगरपरिषद.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना अंतर्गत निधीतून पर्यावरण पूरक गॅस शवदाहिनी बोरी स्मशानभूमीमध्ये उभारण्यात आली आहे. पर्यावरणाचे रक्षण, प्रदुषणाला पर्याय ठरणारी गॅस शवदाहिनी सामान्य नागरिकांच्या खर्चाच्याच नव्हे तर वेळेची बचत करण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. साधारणतः हजार, पंधराशे रुपये इतक्या नाममात्र दरात गॅस शवदाहिनी प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी महानगर गॅस कंपनीद्वारे वायु पुरवठा करण्यात येणार आहे. लवकरच डमी ट्रायल घेऊन ‘गॅस शवदाहिनी'ची टेस्टींग करण्यात येणार आहे. - निखिल ढोरे, नगर अभियंता - उरण नगरपरिषद.