वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
मोठे होर्डिंग कोसळून ३ जखमी
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कल्याण पश्चिम येथील सहजानंद चौकात लावण्यात आलेले मोठे होर्डिंग अचानक कोसळून ३ नागरिक जखमी झाले, तर अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. २ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सदरची दुर्घटना घडली.
कल्याण पश्चिम सहजानंद चौक परिसरात रस्त्याच्या चारही बाजुला मोठमोठे होर्डिंग उभारण्यात आले आहे. या होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार उपस्थित करुन देखील महापालिका प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केल्याने दुर्घटना घडली आहे. २ ऑसट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सहजानंद चौकात काझी हॉस्पिटल शेजारील भले मोठे होर्डिंग अचानक खाली कोसळले. यामध्ये ३ नागरिक जखमी झाले असून अनेक टु-व्हीलर, काही रिक्षा आणि एका चार चाकी वाहनाचे नुकसान झाले आहे.
होर्डिंगवर बॅनरचे पत्रे लावणाऱ्यांवर कारवाई -आयुक्त जाखड
२ ऑगस्ट रोजी सकाळी होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे कल्याण पश्चिम मधील सहजानंद चौक येथे लावण्यात आलेल्या होर्डिंगच्या पुढील बाजुस लावलेले बॅनर्सचे पत्रे पडल्याने खाली उभ्या असलेल्या गाडीचे नुकसान झाले. घटना घडताच महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, मालमत्ता विभागाचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला.
सदर होर्डिंगवर ज्यांनी बॅनरचे पत्रे लावले आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे ज्या लोकांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत संबंधित कंत्राटदारावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी यावेळी दिली.
त्याचप्रमाणे महापालिकेच्या सर्व प्रभागातील कार्यक्षेत्रात सर्व होर्डिंगची पाहणी करुन सुस्थितीत आहेत किवा कसे? तसेच होर्डिंगवर लावलेले बॅनर योग्यरितीने लावला आहेत किंवा कसे? याबाबत प्रभागांचे सहा. आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल सादर करावा, असे निर्देशही आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले आहेत.