मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनासाठी ‘नमुंमपा'तर्फे सूक्ष्म नियोजन

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेमध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील एकही पात्र महिला वंचित राहू नये याकरिता आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय स्तरापर्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून त्याबाबत सातत्याने आढावा घेतला जात आहे.

यामध्ये जास्तीत जास्त महिलांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवून पात्र महिलांकडून अर्ज भरुन घेण्यात येत असून त्याचवेळी प्राप्त अर्जांची पडताळणी सुरु करण्यात आलेली आहे. जेणेकरुन सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केलेल्या पात्र महिलांना योजनेचा लाभ पहिल्या टप्प्यातच उपलब्ध होईल.

या अनुषंगाने पोर्टल वरील महिला लाभार्थ्यांच्या प्राप्त अर्जांची जलद गतीने छाननी करुन त्यांना योजनेचा लाभ मिळण्याकरिता आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नमुंमपा मुख्यालयामध्ये २ वॉर रुम स्थापन करण्यात आलेल्या आहेत. सदर ठिकाणी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, समाज विकास विभागाचे उपायुक्त तथा योजनेचे नोडल अधिकारी  किसनराव पलांडे, सहा. नोडल अधिकारी प्रबोधन मवाडे यांच्यासह भेट देत कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करीत नियोजनबध्द गती देण्याचे निर्देशित केले.

३१ जुलै २०२४ पर्यंत नवी मुंबई महापालिकेने १११ प्रभागांमध्ये स्थापन केलेल्या अंगणवाडी केंद्रासह एकूण ३२९ ठिकाणांहून ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचे ऑनलाईन २७,०४६ आणि ऑफलाईन २१,५८३ असे एकूण ४६,६२९ अर्ज प्राप्त झालेले आहेत. सदर प्राप्त अर्जांची पडताळणी वार्डस्तरीय समिती मार्फत करण्यात येत आहे. या संदर्भात आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार उपायुक्त किसनराव पलांडे यांनी सर्व विभागांचे सहा.आयुक्त यांची ऑनलाईन बैठक घेऊन तांत्रिक अडचणींबाबतच्या शंकांचे निरसन केले आहे. तसेच सर्व विभाग अधिकारी यांनी जास्तीत जास्त ऑनलाईन अर्जांची छाननी करावी, असे निर्देशित केले आहे.

याशिवाय प्राप्त अर्जांची छाननी आणखी जलद गतीने व्हावी याकरिता महापालिका मुख्यालयामध्ये २ ठिकाणी वॉर रुमची स्थापना करण्यात आलेली असून येथे ४० कर्मचाऱ्यांची २ सत्रात नेमणूक करण्यात आलेली आहे. याकरिता सकाळी ८ ते दुपारी ३ तसेच दुपारी ३ ते रात्री १० अशा २ सत्रात छाननीचे काम सुरु करण्यात आलेले आहे.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता नमुंमपा क्षेत्रामध्ये बॅनर, पोस्टर, होर्डींग, हँडबिल तसेच सोशल मिडीया आणि वर्तमानपत्रे अशा विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती करण्यात आलेली आहे. समुह संघटक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या मार्फतही महिला बचत गट आणि महिलांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन योजनेची माहिती दिली जाऊन अर्ज भरुन घेतले जात आहे.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेमधील पात्र महिलांना लवकरात लवकर लाभ मिळावा याकरिता नवी मुंबई महापालिकेने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार अर्ज भरुन घेणे, तसेच पोर्टलवर दाखल अर्जांची छाननी करणे या दोन्ही कामांना समांतर गती दिलेली आहे. दरम्यान, ज्या पात्र महिलांनी अद्याप अर्ज दाखल केलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरुन दरमहिना १५०० रुपये इतक्या रक्कमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 मोठे होर्डिंग कोसळून ३ जखमी