केबीपी कॉलेज तर्फे करावे येथे बियाणे लागवड

नवी मुंबई : रयत शिक्षण संस्था संचालित वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) महाविद्यालय मधील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी ‘वन महोत्सव सप्ताह' निमित्त टी. एस. चाणक्य (भारतीय सागरी विद्यापीठ, नवी मुंबई) कॉलेज येथे बियाणे लागवड उपक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.

केबीपी कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी आयोजित केलेल्या बियाणे लागवड या उपक्रमाअंतर्गत नेरुळ सेवटर-३४ मधील करावे गाव येथील टी.एस.चाणक्य कॉलेज प्रांगणात बियांची लागवड करण्यात आली. बियाणे लागवड म्हणजे शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता, आर्थिक स्थिती आणि पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव टाकणारी एक महत्वपूर्ण प्रक्रिया आहे. योग्य बियाण्यांची निवड आणि लागवड केल्याने एकूणच शेतीचे आरोग्य सुधारते आणि शाश्वत शेतीची वाटचाल सुलभ होते. या कार्यक्रमात ‘वृक्ष असती वसुंधरेचे जीवन, वृक्ष लावून करा तिचे रक्षण', असा मोलाचा संदेश केबीपी कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी नागरिकांपर्यंत पोहोचवला.या अभूतपुर्व उपक्रमात केबीपी कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजनातील ९ स्वयंसेवकांनी सहभाग दर्शवला.

या प्रसंगी ‘कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय'च्या प्राचार्या डॉ.शुभदा नायक, नवी मुंबई विभाग समन्वयक डॉ. पी. जी. भाले, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी आणि चेअरमन डॉ. एल. व्ही. गवळी, प्रा.अमित सुर्वे यांनी  राष्ट्रीय सेवा योजनातील स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे नेतृत्व ‘राष्ट्रीय सेवा योजना'चे स्वयंसेवक विग्नेश जरे आणि पूजा नवशे यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनासाठी ‘नमुंमपा'तर्फे सूक्ष्म नियोजन